
लातूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शहरातील अनेक भागांतील व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने आणि विविध व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने लातूर शहरात कडकडीत बंदचे चित्र पाहायला मिळाले.
बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी ९ वाजल्यापासून मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना नमन करून बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला नागरिक आणि व्यापाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज एकवटल्याचे चित्र लातूरमध्ये दिसून आले. बंद शांततेत आणि उत्स्फूर्तपणे यशस्वी करण्यासाठी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विविध भागांत आवाहन केले.मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. लातूरच्या कडकडीत बंदमुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला मिळणारा व्यापक पाठिंबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis