
नांदेड, 03 सप्टेंबर (हिं.स.)।गणेशोत्सव व दहीहंडी उत्सव एकत्रित येत असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी परस्पर सौहार्द, शांतता व सर्वधर्मसमभाव राखून सण साजरे करावेत. नांदेड जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करून पर्यावरण संरक्षणाचा वेगळा संदेश द्यावा, तसेच गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे गणेशोत्सव, दहीहंडी, पोळा व इतर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीस आमदार अमर राजूरकर, महापौर कविता मुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी कर्डिले यांनी गणेशोत्सव काळात कोणालाही त्रास होणार नाही याची मंडळांनी दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करता डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा. नदीच्या वाहत्या प्रवाहात गणेशमूर्तींचे विसर्जन न करता कृत्रिम तलावांचा वापर करावा. घरगुती गणेशमूर्तींचे घरोघरी संकलन करण्याबाबतही प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. उत्सव काळातील नागरिक व गणेश मंडळांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने व्हॉट्सॲपग्रुप तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आमदार अमर राजूरकर यांनी शहरात अधिकाधिक कृत्रिम तलावांची निर्मिती करून डीजेमुक्त व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. महापौर कविता मुळे यांनी इको फ्रेंडली गणपती बसवून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.
------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis