
लातूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)।जिल्ह्यातील दुचाकीस्वारांची सुरक्षितता आणि रस्ते अपघातांमधील जीवितहानी कमी करण्यासाठी लातूर पोलिसांकडून सुरू असलेल्या हेल्मेट सक्तीच्या मोहिमेला आता जनजागृतीची अधिक व्यापक जोड देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून हेल्मेट विक्रेत्यांशी थेट संवाद साधला. नागरिकांना चांगल्या प्रतीचे हेल्मेट वाजवी व परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन त्यांनी विक्रेत्यांना केले.
लातूर जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर नियमाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईसोबतच नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यावरही पोलिसांकडून भर दिला जात आहे.
पोलीस अधीक्षकांनी स्वतः तपासला हेल्मेटचा दर्जा
हेल्मेट सक्तीच्या पार्श्वभूमीवर अमोल तांबे यांनी रस्त्याच्या कडेला हेल्मेट विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी विक्रेत्यांकडून हेल्मेटची गुणवत्ता, उपलब्ध प्रकार, किंमत तसेच नागरिकांना ते सहज परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत आहेत का, याची माहिती घेतली.पोलीस अधीक्षकांनी स्वतः हेल्मेट हातात घेऊन त्याची पाहणी केली. नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने हेल्मेट दर्जेदार आणि सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ विक्री करण्याऐवजी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन चांगल्या प्रतीची हेल्मेट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांनी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
कमी नफ्यात वाजवी दरात विक्री करण्याचे आवाहन
हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे सध्या मोठ्या संख्येने नागरिक हेल्मेट खरेदी करत आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन हेल्मेटच्या किमती वाढवू नयेत. नागरिकांना दर्जेदार हेल्मेट वाजवी आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून द्यावे, असे पोलीस अधीक्षकांनी विक्रेत्यांना स्पष्टपणे सांगितले.दर्जेदार हेल्मेट सर्वसामान्यांना सहज उपलब्ध झाल्यास त्याचा वापर वाढण्यास मदत होईल. त्यामुळे विक्रेत्यांनी कमी नफा ठेवून नागरिकांच्या सुरक्षेच्या या मोहिमेत सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विनाहेल्मेट दुचाकीस्वारांशीही संवाद
हेल्मेट विक्रेत्यांशी संवाद साधल्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी रस्त्यावर विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांशीही थेट संवाद साधला. हेल्मेट हे केवळ वाहतूक नियमाचे पालन करण्यासाठीचे साधन नसून अपघाताच्या वेळी डोक्याला होणारी गंभीर इजा टाळण्यासाठी आणि जीव वाचविण्यासाठी महत्त्वाचे सुरक्षा कवच असल्याचे त्यांनी समजावून सांगितले.दुचाकी चालविताना प्रत्येक वेळी हेल्मेटचा वापर करावा. स्वतःच्या जीवितासोबतच आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचाही विचार करावा, असे आवाहन त्यांनी दुचाकीस्वारांना केले.
दंडापेक्षा नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य
हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करताना केवळ दंडात्मक कारवाई करणे हा पोलिसांचा उद्देश नसून, अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करणे आणि नागरिकांचे प्राण वाचविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.पोलीस अधीक्षकांनी स्वतः रस्त्यावर उतरून हेल्मेट विक्रेत्यांशी संवाद साधणे, हेल्मेटचा दर्जा आणि किंमत तपासणे तसेच विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगणे, यातून या मोहिमेतील पोलिसांची संवेदनशील भूमिका अधोरेखित झाली आहे.
‘हेल्मेट हे ओझे नसून सुरक्षा कवच’
हेल्मेट सक्तीची मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलिसांसोबत हेल्मेट विक्रेते, दुचाकीस्वार, वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी स्वतःहून चांगल्या प्रतीचे हेल्मेट खरेदी करून प्रत्येक दुचाकी प्रवासात त्याचा नियमित वापर करावा, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.‘हेल्मेट हे ओझे नसून कुटुंबाचे सुरक्षा कवच आहे,’ हा संदेश प्रत्येक दुचाकीस्वाराने लक्षात ठेवण्याची गरज आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा जीव आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेट वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.लातूर जिल्ह्यात हेल्मेट वापराचे प्रमाण शंभर टक्के करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून ही मोहीम जनसहभागातून यशस्वी करावी, असे आवाहन लातूर पोलीस विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis