नायजेरियात तेल चोरीचा प्रयत्न करताना विषारी वायूची गळती; 37 जणांचा मृत्यू
अबुजा, 04 सप्टेंबर (हिं.स.)। नायजेरियातील एका पर्यावरणविषयक संस्थेने शुक्रवारी दावा केला की, तेल पाइपलाइनमधून तेल चोरी करण्याचा प्रयत्न करताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने किमान 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप मृतांचा आकडा अ
नायजेरियात तेल चोरीचा प्रयत्न करताना विषारी वायूची गळती; 37 जणांचा मृत्यू


अबुजा, 04 सप्टेंबर (हिं.स.)। नायजेरियातील एका पर्यावरणविषयक संस्थेने शुक्रवारी दावा केला की, तेल पाइपलाइनमधून तेल चोरी करण्याचा प्रयत्न करताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने किमान 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप मृतांचा आकडा अधिकृतपणे जाहीर केलेला नाही.ही भीषण दुर्घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास रिव्हर्स राज्यातील ओक्रिका परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ओकारी जेट्टी येथे एका मोठ्या जहाजात तेल भरले जात असताना काही संशयित तेलचोरांनी पाइपलाइनमधून उच्च दाबाने वाहणारे पेट्रोलियम उत्पादन बेकायदेशीररीत्या आपल्या बोटींमध्ये भरण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान विषारी वायूची गळती झाली. या दुर्घटनेत अनेक जण अद्याप बेपत्ता असल्याचे संस्थेने म्हटले आहे. तसेच, नदीत काही मृतदेह तरंगताना दिसल्याचेही सांगण्यात आले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कच्चे तेल चोरण्याच्या प्रयत्नादरम्यान ही दुर्घटना घडली.

वृत्तानुसार, रिव्हर्स पोलिसांचे प्रवक्ते एएसपी ब्लेसिंग काबोर्लो अगाबे यांनी सांगितले की, दुर्घटनेमागील परिस्थिती आणि वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण आणि मृतांची अचूक संख्या अद्याप निश्चित झालेली नाही. नायजेरिया सिक्युरिटी अँड सिव्हिल डिफेन्स कॉर्प्सनेही सांगितले की, मृत, जखमी आणि बेपत्ता व्यक्तींच्या संख्येबाबतचे दावे अद्याप अधिकृतपणे पडताळले गेलेले नाहीत. तसेच, या दुर्घटनेत नेमका कोणता रासायनिक पदार्थ सहभागी होता, याची तांत्रिक तपासणी करणेही आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मृत, जखमी आणि बेपत्ता व्यक्तींची अचूक संख्या निश्चित करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा इतर संबंधित एजन्सींसोबत समन्वयाने काम करत आहेत. यासोबतच संभाव्य निष्काळजीपणा, स्थानिक पातळीवरील संगनमत किंवा गुन्हेगारी स्वरूपाची मदत झाली आहे का, याचाही तपास केला जात आहे.

नायजर डेल्टा परिसरात कच्च्या तेलाची चोरी आणि पाइपलाइनची तोडफोड ही दीर्घकाळापासूनची गंभीर समस्या आहे. ऑक्टोबर 2023 नंतर या प्रकारच्या दुर्घटनेत इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू झाल्याचा हा सर्वात मोठा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. या भागात बेकायदेशीररीत्या तेल काढण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे अनेकदा जीवघेणे अपघात होतात आणि मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचे प्रदूषण होते. याचा नायजेरियाच्या तेल उद्योगालाही मोठा फटका बसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande