
इस्लामाबाद, 04 सप्टेंबर (हिं.स.)।भारतीय वायुसेनेच्या एका निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारतीय वायुसेनेने सलग 17 दिवस मोठा युद्धसराव आयोजित करण्यासाठी ‘नोटीस टू एअर मिशन्स’ (नोटम) जारी केले आहे. भारतीय वायुसेनेने 21 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीसाठी हवाई क्षेत्राबाबत नोटम जारी केला आहे. यामुळे पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, त्यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, सुरक्षा क्षेत्रातील एका सूत्राने सांगितले की, भारताने जारी केलेल्या या अधिसूचनेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. याबाबतची माहिती पाकिस्तानच्या चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेसच्या कार्यालयालाही देण्यात आली आहे. या घडामोडींवरून इस्लामाबाद भारताकडून सीमेच्या जवळ करण्यात येणाऱ्या लष्करी सरावांकडे किती गांभीर्याने पाहत आहे, हे स्पष्ट होते.
भारताच्या या मोठ्या युद्धसरावाची माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी मात्र संयमित प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, यामुळे पाकिस्तानला कोणतीही चिंता नाही. माध्यमांशी बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले, “चिंता करण्यासारखे काहीही नाही. त्यांचा भूतकाळातील जो पॅटर्न राहिला आहे, तोच आहे. ते जो सराव करत आहेत, तोही नियमित आहे. त्यांनी नोटम जारी केला आहे. मात्र, तुम्ही पाकिस्तानसाठी काही धोका आहे का, असा प्रश्न विचारत असाल, तर परिस्थिती तशीच राहील—‘दमादम मस्त कलंदर’.”
दरम्यान, भारतीय वायुसेनेने नोटम जारी केल्यानंतर पाकिस्तानने आपल्या सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवले आहे. सीमेवरील सुरक्षा आणि गस्त वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानी संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांचे दल पूर्णपणे सज्ज असून भारतीय वायुसेनेच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode