
काठमांडू, 04 सप्टेंबर (हिं.स.)।पुरामुळे झालेल्या नुकसानीबद्दल नेपाळ भारताकडून नुकसानभरपाई मागत असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. नेपाळने भारताकडून कोणत्याही आर्थिक नुकसानभरपाईची मागणी केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण स्वतः किंवा नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयातील अथवा सरकारमधील कोणत्याही व्यक्तीने भारत, चीन किंवा अमेरिकेकडून नुकसानभरपाई मागितलेली नाही, असे खनाल यांनी ठामपणे सांगितले.
नुकसानभरपाई मागण्याऐवजी हवामान बदलाचे परिणाम समजून घेहणे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी एकत्रितपणे काम करणे, हे नेपाळचे आवाहन असल्याचे खनाल यांनी सांगितले. हिमालयीन प्रदेशातील भारत, नेपाळ आणि चीनची पर्यावरणीय परिस्थिती परस्परांशी जोडलेली आहे. वाढते तापमान आणि हवामान बदलामुळे या तिन्ही देशांवर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रादेशिक देशांनी अशा आपत्तींसाठी अधिक चांगली तयारी करणे गरजेचे आहे. तसेच जगभरातील इतर देशांनीही नेपाळसारख्या लहान देशांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे त्यांनी म्हटले.
नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपत्तीनंतर लगेचच भारताने केलेल्या मदत आणि बचावकार्याचे कौतुक केले. भारत सुरुवातीपासूनच काठमांडूच्या संपर्कात होता आणि गरजेनुसार सर्वतोपरी मदत देण्याची तयारी दर्शवली होती, असे त्यांनी सांगितले.भारताने नेपाळला मदत साहित्य, बचाव उपकरणे, तात्पुरत्या पुलांसाठी आवश्यक साहित्य, पाणी उपसा करणारी यंत्रे आणि इतर अत्यावश्यक वस्तू पाठवल्या. याशिवाय वैद्यकीय साहित्य, जनरेटर, सौर दिवे, तंबू आणि जलशुद्धीकरण युनिट्सही नेपाळला पाठवण्यात आले.
भारताचे पहिले मदत विमान २६ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये दाखल झाले. या विमानातून तात्पुरती निवारागृहे, ब्लँकेट्स, स्वच्छता किट, सौर दिवे आणि औषधांसह १० टन मदत साहित्य पाठवण्यात आले. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी ३७.५ टन मदत साहित्याची दुसरी खेप पाठवण्यात आली. यात तंबू, ब्लँकेट्स, स्वच्छता किट, सौर दिवे, पाण्याचे पंप, स्वयंपाकघरातील भांडी, जनरेटर, औषधे आणि खाद्यपदार्थांचा समावेश होता. त्यानंतर आणखी १० टन मदत साहित्याची खेप पाठवण्यात आली. भारताने बुधवारी ११ सदस्यीय बचाव पथक, विशेष उपकरणे आणि ५.५ टन अत्यावश्यक औषधांसह पाचवे विमानही नेपाळला पाठवले.
मदत आणि बचावकार्याबरोबरच भारताने नेपाळला न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) सहाय्यही दिले आहे. नेपाळमध्ये मोठ्या संख्येने लोक बेपत्ता असल्याने मृतदेहांची ओळख पटवणे हे मोठे आव्हान बनले आहे. या क्षेत्रातही भारताने मदत केल्याचे खनाल यांनी सांगितले.दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये गरजेनुसार सातत्याने संवाद सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नेपाळकडून नव्या गरजांची माहिती भारताला दिली जाते आणि नवी दिल्लीकडून मदतीसाठी तत्परता दर्शवली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, रसुवा येथील विनाशकारी पुरामुळे गुरुवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत मृतांचा आकडा १,२८२ वर पोहोचला होता. या आपत्तीमुळे उत्तर आणि मध्य नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे.
खनाल यांनी सांगितले की, आता गरज केवळ तात्काळ मदत देण्यापुरती मर्यादित नाही. वाढते तापमान आणि हवामान बदलामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या अशा आपत्तींसाठी दीर्घकालीन तयारी करणे आवश्यक आहे. नेपाळची सुरक्षा, संस्कृती, वारसा आणि भविष्यासाठी प्रादेशिक सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode