
अमरावती, 04 सप्टेंबर (हिं.स.) | अमरावती शहराला हादरवून सोडणाऱ्या रवी नगर चौकातील १७ वर्षीय शर्वरी गणेश हाडके हिच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणाला अखेर मोठे वळण मिळाले आहे. भरदिवसा शर्वरीवर जीवघेणा हल्ला करून घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपी आनंद भड याला राजापेठ पोलिसांच्या डीबी पथकाने अवघ्या काही तासांत गोंदिया येथून जेरबंद केले. आरोपीकडे मोबाईल फोन नसतानाही पोलिसांनी तांत्रिक तपास आणि उपलब्ध माहितीच्या आधारे त्याचा माग काढत ही धडाकेबाज कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
शर्वरी हाडके हिच्यावर बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास रवी नगर चौक परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर ती रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडली होती. परिसरातील काही ऑटोचालकांनी तत्परता दाखवत तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान शर्वरीची प्राणज्योत मालवली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे अमरावती शहरात एकच खळबळ उडाली होती.
घटनेनंतर आरोपी आनंद भड घटनास्थळावरून पसार झाला. आरोपीकडे मोबाईल फोन नसल्याने त्याचा ठावठिकाणा शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, राजापेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नितीन शिंदे आणि डीबी पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरील माहिती, तांत्रिक तपास आणि इतर उपलब्ध धागेदोरे एकत्रित करून आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपी बडनेरा रेल्वे स्थानकावरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत चढल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली.
यानंतर पोलिसांसमोर धावत्या रेल्वेतील आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, एपीआय नितीन शिंदे आणि डीबी पथकाने तपासकौशल्य पणाला लावत आरोपीच्या प्रवासाची साखळी जोडली. अखेर आरोपी आनंद भड याला गोंदिया येथे शोधून पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीला अमरावतीकडे आणण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपासात हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आरोपीला अवघ्या काही तासांत जेरबंद करण्यात यश मिळाल्याने राजापेठ पोलिसांच्या डीबी पथकाच्या तपासकौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, अल्पवयीन शर्वरीच्या दुर्दैवी मृत्यूने अमरावती शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी