
₹20,703 कोटींच्या विविध रेल्वे प्रकल्पांना सुरुवात; प्रवासी आणि मालवाहतुकीची क्षमता वाढणार
रायगड, 8 सप्टेंबर (हिं.स.) : गुजरात आणि मध्य प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधांना मोठी चालना देणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. तब्बल 20 हजार 703 कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पांमध्ये 326 रूट किलोमीटर लांबीच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसह रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, गेज परिवर्तन आणि नवीन रेल्वेमार्गांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे दोन्ही राज्यांतील प्रवासी तसेच मालवाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे.
यातील वडोदरा–रतलाम तिसरी व चौथी रेल्वे लाईन हा 259 किलोमीटर लांबीचा आणि 8 हजार 885 कोटी रुपयांचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या मार्गामुळे गुजरात आणि मध्य प्रदेशमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून, गुजरातला मध्य प्रदेश आणि उत्तर भारताशी जोडणाऱ्या व्यस्त रेल्वे कॉरिडॉरला अतिरिक्त क्षमता मिळणार आहे. रेल्वेगाड्यांचे संचालन अधिक वेगवान आणि सुरळीत होण्यासोबतच उद्योग, व्यापार आणि पर्यटनालाही याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
विश्वामित्री–डभोई या 33 किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी 394 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामामुळे वडोदरा परिसरातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासोबतच रेल्वे वाहतूक अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम होणार आहे. विशेषतः स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाणाऱ्या पर्यटनाला या प्रकल्पाचा थेट लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, मियागाम करजन–चोरंडा–मालसर या 37 किलोमीटर मार्गाचे 450 कोटी रुपयांच्या खर्चातून गेज परिवर्तन करण्यात येणार आहे. ब्रॉडगेज मार्गामुळे प्रवासी आणि मालगाड्यांचे संचालन अधिक सुलभ होईल. तसेच स्थानिक आर्थिक केंद्रांना राष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्यास या प्रकल्पाची मदत होणार आहे.
जोबट–टांडा रोड या 28 किलोमीटर नवीन रेल्वेमार्गाचा 553 कोटी रुपयांच्या खर्चातून विकास करण्यात आला आहे. या मार्गामुळे गुजरात आणि मध्य प्रदेशातील आदिवासी तसेच दुर्गम भागांना रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे. परिणामी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि बाजारपेठांपर्यंत पोहोचणे स्थानिक नागरिकांसाठी अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर राष्ट्राला समर्पित करण्यात आला असून चार मालगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. स्वतंत्र, वेगवान आणि उच्च क्षमतेच्या या मालवाहतूक मार्गामुळे प्रमुख बंदरे आणि औद्योगिक क्षेत्रांमधील मालवाहतूक अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. त्यातून लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होण्याबरोबरच प्रवासी रेल्वेमार्गांवरील गर्दीही कमी होण्याची अपेक्षा आहे.
या विविध प्रकल्पांमुळे गुजरात आणि मध्य प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधांना नवी गती मिळणार असून, मालवाहतूक, उद्योग, व्यापार, पर्यटन आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)