
मुंबई, 08 सप्टेंबर (हिं.स.)। विकसित महाराष्ट्र 2047 च्या ध्येयपूर्तीसाठी आरोग्य क्षेत्र महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार असून वैद्यकीय तंत्रज्ञान, डिजिटल हेल्थ, जैवतंत्रज्ञान, संशोधन आणि प्रगत वैद्यकीय उपकरण निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राजशिष्टाचार, परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणि प्रवासी महाराष्ट्रीय संपर्क मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) आयोजित ‘सीआयआय हॉस्पिटल टेक 2026’ परिषदेत ते बोलत होते. यावेळी पद्मश्री डॉ. रमाकांत देशपांडे, जॉय चक्रवर्ती, सौरभ अग्रवाल, रिझवान कोईटा, नेदरलँड्स व युनायटेड किंगडम सरकारचे प्रतिनिधी, अल्पा अंतानी, ब्रिटिश उप उच्चायुक्त हरजिंदर कांग, नेदरलॅण्ड चे वाणिज्य दूत थिअरी वॅन हेल्डन तसेच आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले, आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, टेलिमेडिसिन, प्रगत निदान तंत्रज्ञान आणि डिजिटल हेल्थमुळे मोठे परिवर्तन होत असले तरी तंत्रज्ञान रुग्णकेंद्रित आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ राहणे आवश्यक आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात जागतिक दर्जाची रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, संशोधन संस्था, औषधनिर्मिती कंपन्या आणि आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सचे सक्षम जाळे निर्माण झाले असून या बळावर राज्याला आरोग्य नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनविण्याचा शासनाचा मानस आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित महाराष्ट्र 2047’ च्या ध्येयाद्वारे गती दिली जात आहे. राज्यातील सक्षम औषधनिर्मिती, जैवतंत्रज्ञान क्षेत्र, कुशल डॉक्टर आणि आरोग्य व्यावसायिक यांच्या बळावर जागतिक गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि संशोधन सहकार्य आकर्षित करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
राजशिष्टाचार विभागामार्फत परकीय गुंतवणूक, प्रवासी महाराष्ट्रीय संपर्क आणि परदेशी दूतावासांशी समन्वय वाढवून महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे रूपांतर गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि ज्ञान भागीदारीमध्ये करण्यावर भर दिला जात आहे. तसेच जगभरातील महाराष्ट्रीय डॉक्टर, संशोधक आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अनुभवाचा उपयोग संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि नव्या आरोग्य उपक्रमांसाठी केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण 2025 च्या माध्यमातून आरोग्य आणि जीवन विज्ञान क्षेत्राला राज्याच्या विकासाचे महत्त्वाचे इंजिन बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असून मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती आणि गडचिरोलीपर्यंत या विकासाचे लाभ पोहोचविण्यावर भर दिला जात असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.
भारतीय व आंतरराष्ट्रीय उद्योग, रुग्णालये, संशोधन संस्था, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेषकांनी महाराष्ट्रात संशोधन, नवोन्मेष आणि गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर