कर्ज, विमा, बचत, गुंतवणूक अन् पेन्शन सर्वांसाठी सुलभ करा : पंतप्रधान
ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 चे मुंबईत उद्घाटन यूपीआयच्या जागतिक विस्तारासह स्वदेशी मानके विकसित करण्याचे आवाहन मुंबई, 08 सप्टेंबर (हि.स.)। भारताच्या फिनटेक क्षेत्राने डिजिटल पेमेंटच्या पलीकडे झेप घेत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कर्ज, विमा, बचत, गुं
पंतप्रधान नरेंद्र मोदी


ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 चे मुंबईत उद्घाटन

यूपीआयच्या जागतिक विस्तारासह स्वदेशी मानके विकसित करण्याचे आवाहन

मुंबई, 08 सप्टेंबर (हि.स.)। भारताच्या फिनटेक क्षेत्राने डिजिटल पेमेंटच्या पलीकडे झेप घेत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कर्ज, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन यांसारख्या वित्तीय सेवा पोहोचवाव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2026 चे उद्घाटन करताना त्यांनी फिनटेकच्या पुढील पर्वाची दिशा स्पष्ट केली.

भारताच्या फिनटेक क्षेत्राने आतापर्यंत उल्लेखनीय प्रगती केली असून, पारंपरिक वित्तीय व्यवस्थेच्या कक्षेबाहेर असलेल्या कोट्यवधी नागरिकांना औपचारिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याची क्षमता या क्षेत्रात आहे, असे मोदी यांनी सांगितले. भारताच्या फिनटेक प्रवासाचे वर्णन त्यांनी ‘अद्भुत’ असे करत यूपीआयला या यशाचा प्रमुख आधारस्तंभ म्हटले. यूपीआयने 25 ऑगस्ट रोजी दशकपूर्ती केली. एक दशकापूर्वी बँकिंग सेवा सामान्य नागरिकांच्या बोटांवर आणण्याची कल्पना अनेकांना अशक्य वाटत होती; मात्र आज पिढ्यान्‌पिढ्या बँकिंग व्यवस्थेपासून दूर राहिलेले कोट्यवधी भारतीय फिनटेक विकासाचे प्रमुख चालक बनले आहेत, असे मोदी म्हणाले. केवळ ऑगस्टमध्ये यूपीआयच्या माध्यमातून 2400 कोटींहून अधिक व्यवहार झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

यूपीआयचा जागतिक विस्तार पुढील लक्ष्य

यूपीआय आता 11 देशांमध्ये कार्यरत असून, विविध देशांमध्ये त्याची उपलब्धता हा केवळ पहिला टप्पा आहे. पुढील टप्प्यात या देशांच्या स्थानिक पेमेंट प्रणाली यूपीआयशी जोडण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, असे मोदी यांनी सांगितले.भारताशी मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे देश, मोठ्या संख्येने भारतीय नागरिक वास्तव्यास असलेले देश तसेच भारतासोबत विकासाच्या दिशेने वाटचाल करू इच्छिणारे देश यांच्या पेमेंट प्रणाली परस्पर जोडण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. भारतात परदेशातून पाठविल्या जाणाऱ्या पैशांवरील व्यवहार शुल्क कमी करून, यूपीआयच्या माध्यमातून हा पैसा अधिक वेगाने भारतीय कुटुंबांपर्यंत पोहोचविता येऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘आपली मानके आपणच ठरवूया’

भारताची कार्ड पेमेंट व्यवस्था दीर्घकाळ इतर देशांनी विकसित केलेल्या मानके आणि नियमांवर आधारित होती. आता परिस्थिती बदलली असून भारतीय फिनटेक क्षेत्राने स्वतःची नियमावली आणि मानके विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर जोडण्याचे काम करावे, असे आवाहन मोदी यांनी केले.फिनटेकचा मोठा हिस्सा सध्या पेमेंट सेवांवर केंद्रित आहे. मात्र, आता या क्षेत्राने पुढील पातळीवर जाण्याची वेळ आली आहे. डिजिटल पेमेंटप्रमाणेच कर्ज, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन या सेवा सामान्य नागरिकांसाठी सहज आणि सुलभ केल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.डिलिव्हरी पार्टनर, छोटे व्यावसायिक किंवा अनौपचारिक क्षेत्रातील नियमित उत्पन्न मिळविणाऱ्या व्यक्तींनाही बचत आणि पेन्शनसारख्या वित्तीय उत्पादनांपर्यंत सहज पोहोच मिळाली पाहिजे. ज्या पद्धतीने क्यूआर कोडमुळे पेमेंट सुलभ झाले, त्याच धर्तीवर तंत्रज्ञानाच्या मदतीने वित्तीय सेवाही सर्वांसाठी सहज उपलब्ध करून देता येतील, असे मोदी म्हणाले.

पीएम स्वनिधीतून फिनटेकची ताकद अधोरेखित

फिनटेकच्या माध्यमातून आर्थिक समावेशन कसे साधता येते, याचे उदाहरण देताना मोदी यांनी पीएम स्वनिधी योजनेचा उल्लेख केला. देशातील लाखो फेरीवाले आणि छोट्या विक्रेत्यांना औपचारिक कर्जव्यवस्थेशी जोडण्यात फिनटेकची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असून, लाभार्थ्यांना आता स्वनिधी क्रेडिट कार्डसारख्या औपचारिक कर्ज सुविधाही मिळत आहेत.

स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या सरासरी वार्षिक उत्पन्नात २० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे सांगत मोदी यांनी या योजनेमुळे निवास, पोषण, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणाच्या स्थितीतही सुधारणा झाल्याचे नमूद केले.

सरकारने ही योजना २०३० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.छोटे दुकान चालविणाऱ्या महिलेला डिजिटल पेमेंटमुळे तिच्या व्यवसायातील उत्पन्न-खर्चाचा स्पष्ट आर्थिक नमुना उपलब्ध होऊ शकतो. या माहितीच्या आधारे फिनटेक कंपन्या तिची गरज आणि परतफेड क्षमता लक्षात घेऊन कर्जाची रचना करू शकतात. अशा कोट्यवधी छोट्या व्यवसायांसाठी तंत्रज्ञानाधारित अनुकूल वित्तीय उत्पादने विकसित करणे हे फिनटेकच्या पुढील पर्वाचे प्रमुख उद्दिष्ट असावे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

सायबर सुरक्षा, ग्राहक संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य

फिनटेक क्षेत्रासमोर चार प्रमुख प्राधान्यक्रम ठेवताना मोदी यांनी सायबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. उद्योग क्षेत्राने स्वतःची नैतिक डेटा संरक्षण मानके विकसित करावीत, असे त्यांनी सांगितले.त्याचबरोबर मजबूत फिनटेक नियामक व्यवस्था आणि उद्योगाच्या नेतृत्वाखालील नवोन्मेष परिसंस्था विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. फिनटेक ग्राहक संरक्षण निर्देशांक तयार करून त्याच्या आधारे कंपन्यांचे पारदर्शक मूल्यांकन करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.

एआय, टोकनायझेशन, क्वांटम तंत्रज्ञानातून नव्या संधी

२०२६ मध्ये विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करताना एजंटिक एआय, टोकनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञान वित्तीय क्षेत्रासाठी नव्या संधी निर्माण करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

या तंत्रज्ञानातील शक्यतांचे प्रत्यक्ष परिणामांमध्ये रूपांतर करणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी फिनटेक कंपन्यांनी एकत्रितपणे ठोस उद्दिष्टे निश्चित करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

जागतिक अनिश्चिततेत भारताच्या विकासावर विश्वास

जग संघर्ष, आर्थिक अनिश्चितता, ऊर्जा व वस्तूंच्या पुरवठा साखळीवरील दबाव आणि व्यापारविषयक तणावातून जात असताना भारताने एप्रिल-जून तिमाहीत ७.८ टक्के विकासदर नोंदवला आहे. हा विकासदर जगाला नवा विश्वास देणारा असल्याचे मोदी म्हणाले.

जपानमधील एका पतमानांकन संस्थेने भारताच्या सार्वभौम पतमानांकनात सुधारणा केल्याचाही त्यांनी उल्लेख केला. जवळपास तीन दशकांनंतर झालेली ही सुधारणा भारताचा विकासाचा वेग, व्यापक आर्थिक स्थैर्य आणि मागील काही वर्षांतील संरचनात्मक सुधारणांवरील जागतिक विश्वास दर्शवते, असे त्यांनी सांगितले.

‘डिजिटल इंडिया’च्या नव्या अध्यायासाठी भारत सज्ज

भारताच्या फिनटेक यशाची कहाणी व्यापकता, सुरक्षितता, लोकशाहीकरण, तंत्रज्ञान आणि जनतेचा विश्वास या पाच आधारस्तंभांवर उभी आहे. आता याच मूल्यांच्या आधारावर पुढील पिढीतील नवोन्मेषावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

भारताची ‘रिफॉर्म एक्सप्रेस’ आणखी वेगाने पुढे जाईल आणि ‘डिजिटल इंडिया’च्या यशोगाथेचा नवा अध्याय लिहिण्यासाठी देश सज्ज आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.--------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande