ब्रिक्स देशांसोबत रशियाचा 90 टक्के व्यापार राष्ट्रीय चलनात; अमेरिकेची धोरणे कारणीभूत : रशियन प्रवक्ता
नवी दिल्ली, ८ सप्टेंबर (हि.स.) । ब्रिक्स देशांसोबत रशियाचा सुमारे 90 टक्के व्यापार राष्ट्रीय चलनांमध्ये होत असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियाला डॉलरवर आधारित आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेतील प्रवेशावर अमेरिकेकडून निर्बंध घालण्यात आल्याने राष्ट्री
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह


नवी दिल्ली, ८ सप्टेंबर (हि.स.) । ब्रिक्स देशांसोबत रशियाचा सुमारे 90 टक्के व्यापार राष्ट्रीय चलनांमध्ये होत असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियाला डॉलरवर आधारित आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेतील प्रवेशावर अमेरिकेकडून निर्बंध घालण्यात आल्याने राष्ट्रीय चलनांच्या वापराला चालना मिळाल्याचा दावा रशियाने केला आहे. रशिया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून डॉलरच्या वापराच्या विरोधात नसून, अमेरिकेच्या धोरणांमुळेच डॉलरचा प्रभावी वापर अडचणीत आल्याचे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले.

स्पुतनिक इंडियाने नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषदेत पेस्कोव्ह बोलत होते. आगामी ब्रिक्स शिखर परिषद तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पेस्कोव्ह म्हणाले की, ब्रिक्स हा कोणत्याही देशाच्या विरोधात स्थापन झालेला गट नाही. विविध देशांना त्यांच्या राष्ट्रीय हितांची पूर्तता करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे व्यासपीठ म्हणून ब्रिक्सचा उदय झाला आहे. या समूहाचा उद्देश पाश्चिमात्य देशांशी संघर्ष करणे हा नाही.

डॉलरच्या वापराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पेस्कोव्ह म्हणाले, “जर ते आम्हाला त्यांचे चलन (डॉलर) वापरू देणार नसतील, तर आम्ही आमचे चलन (राष्ट्रीय चलन) वापरू. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या डॉलरविरोधी धोरणाचे समर्थन करायचे नाही. आमच्या राष्ट्रीय हितासाठी जे योग्य आहे, तेच आम्ही करत आहोत.

आगामी ब्रिक्स शिखर परिषद आणि भारत-रशिया नेत्यांमधील चर्चेबाबत पेस्कोव्ह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात शुक्रवारी द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चेत व्यापार आणि सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संवेदनशील जागतिक प्रश्नांवर दोन्ही नेते आपापल्या भूमिका मांडतील. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील सहकार्य हादेखील या चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा असेल.

भारताच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ब्रिक्स चर्चेच्या निष्पत्तीबाबत रशिया आशावादी असल्याचेही पेस्कोव्ह यांनी सांगितले. ब्रिक्ससाठी रशियाच्या प्राधान्यक्रमांमध्ये सुरक्षा, आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्याचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रिक्सच्या विचारधारेत बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेची संकल्पना महत्त्वाची असल्याचे पेस्कोव्ह म्हणाले. काही शक्ती पुन्हा एकध्रुवीय जागतिक व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असून, त्यासाठी धोकादायक मार्गांचाही अवलंब केला जात असल्याचा आरोप त्यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता केला. त्याचवेळी जगातील बहुसंख्य देश बहुध्रुवीय व्यवस्थेच्या बाजूने असल्याचे सांगत त्यांनी या प्रक्रियेत भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले.

युक्रेन प्रश्नावर भारताच्या भूमिकेचे पेस्कोव्ह यांनी कौतुक केले. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांनाही त्यांनी महत्त्वाचे ठरवले. युक्रेनमधील संघर्ष रशियाने सुरू केला नसल्याचा दावा करत त्यांनी 2014 मध्ये फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आणि अमेरिकेने सत्ताबदल घडवून आणल्याचा आरोप केला. त्यानंतर राष्ट्रवादी शक्तींनी रशियन लोकांवर दडपशाही सुरू केल्याचे ते म्हणाले.

रशियाला हा संघर्ष संपवायचा असून, त्यासाठी सुरू असलेल्या सर्व प्रयत्नांना रशियाचा पाठिंबा असल्याचे पेस्कोव्ह यांनी सांगितले. तसेच रशिया, युक्रेन आणि अमेरिका यांच्यात लवकरच पुन्हा चर्चा सुरू होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेकडून लादण्यात येणाऱ्या निर्बंधांनाही पेस्कोव्ह यांनी बेकायदेशीर ठरवले. हे निर्बंध आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या नियमांच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande