
मुंबई, 08 सप्टेंबर (हिं.स.)। मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ (एनएमएसीसी) परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमादरम्यान सुरक्षेचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कार्यक्रमाच्या आवारातून मुंबई पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यातील एका तरुणाकडे बनावट पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) ओळखपत्र आढळले आहे. विशेष म्हणजे, हा तरुण स्वतःला पीएमओचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत होता. त्याच्यासोबत असलेल्या खासगी बॉडीगार्डकडे बंदूक आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी एनएमएसीसी परिसरातून रोहन पारेख या २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. पारेख हा कार्यक्रमस्थळी अत्यंत रुबाबात वावरत होता. आपण पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगत त्याने सुरक्षेच्या ठिकाणी प्रवेश मिळवला होता. मात्र, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने विशेष सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी त्याची चौकशी केली. यावेळी त्याने दाखवलेले पीएमओचे ओळखपत्र तपासण्यात आले असता ते बनावट असल्याचे उघड झाले.
या चौकशीदरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली. रोहन पारेख हा कार्यक्रमस्थळी एकटाच आला नव्हता. त्याच्यासोबत एक खासगी बॉडीगार्ड होता. या बॉडीगार्डकडे बंदूक असल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि विशेष संरक्षण गटाच्या (एसपीजी) प्रोटोकॉलची अंमलबजावणी सुरू असताना बनावट ओळखपत्र असलेला तरुण आणि बंदुकधारी व्यक्ती कार्यक्रमस्थळी पोहोचल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकारानंतर मुंबई पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी रोहन पारेख आणि त्याच्या बॉडीगार्डला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. पारेखने बनावट ओळखपत्राचा वापर करून कार्यक्रमस्थळी प्रवेश का मिळवला, त्यामागे नेमका काय हेतू होता आणि बनावट ओळखपत्र त्याने कुठून मिळवले, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास आता मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule