रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ११ सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींशी द्विपक्षीय बैठक
नवी दिल्ली , 08 सप्टेंबर (हिं.स.)।दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात ११ सप्टेंबर रोजी द्विपक्षीय बैठक होणार आहे. क्रेमलिनने पंतप्रधान नरेंद्र मोदी आण
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ११ सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींशी द्विपक्षीय बैठक


नवी दिल्ली , 08 सप्टेंबर (हिं.स.)।दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात ११ सप्टेंबर रोजी द्विपक्षीय बैठक होणार आहे. क्रेमलिनने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात शुक्रवारी होणाऱ्या या बैठकीला दुजोरा देत भारताला रशियाचा ‘धोरणात्मक भागीदार’ असे संबोधले आहे.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी मंगळवारी या बैठकीच्या अजेंड्याबाबत माहिती देताना सांगितले की, भारतात नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारणे आणि एसयू-57 लढाऊ विमानाबाबत चर्चा होणार आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्यांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्के शुल्क लावण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावित निर्णयावर म्हटले की, हे बेकायदेशीर आणि अस्वीकार्य आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये या निर्बंधांबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

प्रवक्त्यांनी सांगितले की, युक्रेन संघर्षाचा शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची नुकतीच एससीओ शिखर परिषदेदरम्यान भेट झाली होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी युद्ध समाप्त करण्याचे आवाहन केले होते. दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात चांगले संबंध आहेत आणि जगभरातील विविध मुद्द्यांवर दोन्ही नेते नियमितपणे एकमेकांशी चर्चा करत असतात. पेस्कोव्ह यांनी अधिकृत पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, भारत हा आमचा धोरणात्मक भागीदार आहे. हे दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी पुढे सांगितले की, दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्यही सातत्याने वाढत आहे.

याशिवाय, भारतीय नागरिकांना जबरदस्तीने रशियन सैन्यात भरती करण्याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, सध्या रशियातील युद्धभूमीवर किती भारतीय नागरिक आहेत, याची यादी तयार केली जात आहे. ही यादी तयार झाल्यानंतर संबंधित भारतीयांना भारतात परत पाठवले जाईल.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी स्पुतनिक इंडियाच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, ब्रिक्स देश आता 90 टक्के व्यवहार राष्ट्रीय चलनांमध्ये करत आहेत. रशिया भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाचे कौतुक करतो आणि आगामी शिखर परिषदेत सकारात्मक परिणाम मिळतील, असा विश्वास आहे. त्यांनी सांगितले की, पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अत्यंत जवळचे वैयक्तिक संबंध आहेत आणि दोन्ही नेते अत्यंत संवेदनशील मुद्द्यांवरही एकत्रितपणे चर्चा करण्यास सक्षम आहेत.

राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे 11 ते 13 सप्टेंबर 2026 या कालावधीत तीन दिवसांची ब्रिक्स शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. यंदा भारताकडे ब्रिक्सचे अध्यक्षपद आहे. या परिषदेत ब्रिक्स देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande