केंद्रामुळे ओबीसी आणि मराठा आरक्षणाची गुंतागुंत वाढली- अशोक चव्हाण
नागपूर, 16 सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आणि ओबीसी आरक्षणातील गुंतागुंत वाढल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम
अशोक चव्हाण


नागपूर, 16 सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आणि ओबीसी आरक्षणातील गुंतागुंत वाढल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. यवतमाळला जाण्यापूर्वी नागपूर विमानतळावर ते बोलत होते.

यावेळी चव्हाण म्हणाले की, आरक्षणाचा विषय केवळ महाराष्ट्र किंवा मराठा व ओबीसी समाजापुरता मर्यादित नाही. देशातील विविध मागास जातीजमाती आरक्षणासाठी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेबाबत सर्वांनाच विचार करण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही महाविकासआघाडीची प्रामाणिक भूमिका होती. या संदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याचिका प्रलंबित असताना मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याची वेळ नव्याने आली आहे. यास किती कालावधी लागेल हे आताच सांगता येणार नाही. मात्र, सारथीच्या माध्यमातून समाजाला मदत केली जात असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

खासदार संभाजी राजे यांनी अधिकाऱ्यांवर केलेल्या टीकेबद्दल बोलण्यास चव्हाण यांनी नकार दिला. तसेच सरकार व अधिकारी काम करीत आहे. संभाजी राजे यांनी देखील पुढाकार घेऊन सहकार्य करावे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका घेणे योग्य होणार नाही, असेही अशोक चव्हाण म्हणाले. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपांवर चव्हाण म्हणाले की, किरीट सोमय्या बेछूट आरोप करतात. त्यासाठी केंद्रीय एजंसींचा वापर केला जातो. राजकीय सूडबुद्धीने सध्या काम केले जात असून, हे लोकशाही मारक आहे. दरम्यान ऊर्जा विभागाबाबत बैठकीत काँग्रेसच्या मंत्र्यांनी आरोप केले हे वृत्त निराधार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande