अमरावती विभागात दिव्यांग, ज्येष्ठ व नवमतदारांनी उत्साहात केले मतदान
अमरावती, 26 एप्रिल, (हिं.स.) - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभाग
अमरावती विभागात दिव्यांग, ज्येष्ठ व नवमतदारांनी उत्साहात केले मतदान


अमरावती, 26 एप्रिल, (हिं.स.) - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजतापासुनच मतदारांनी हजेरी लावली होती. ठिक-ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा दिसल्या. दिव्यांग व जेष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर, रॅम्प यासारख्या विशेष व्यवस्था करण्यात आल्या होत्या.

विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 53.31 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडल्यामुळे मतदानाला वेग आला. मतदान केंद्रांवर महिला व युवा मतदारांची एकच गर्दी दिसून आली.

अमरावती लोकसभा मतदारसंघात विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय तसेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सपत्नीक सेंन्ट थॉमस महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मतदान केले.

अमरावती विधानसभा मतदारसंघातील सेंट थॉमस महाविद्यालय, जि.प. उर्दु हायस्कुल, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, विदर्भ ज्ञान-विज्ञान महाविद्यालय तसेच राजापेठ परिसरातील भारतीय महाविद्यालय, समर्थ हायस्कुल याठिकाणी सकाळी सात वाजतापासूनच मतदानासाठी मतदारांच्या लांब रांगा दिसून आल्या. राजापेठ परिसरातील भारतीय महाविद्यालयाच्या सखी मतदान केंद्रावर महिलांची विशेष उपस्थिती दिसून आली. तसेच दिव्यांग व वयोवृध्द व्यक्तींसाठी स्थापित करण्यात आलेल्या कॅम्प परिसरातील जिल्हा परिषद माजी कन्या शाळेतील मतदान केंद्रावर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसून आली. गाडगेनगर परिसरातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रावरही मतदारांची गर्दी दिसून आली. सर्व मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदान यादी, पिण्याचे पाणी, दिव्यांग व ज्येष्ठ व्यक्तींसाठी व्हीलचेअर, सावलीचा मंडप, बैठक व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती.

असे झाले मतदान….

विभागातील 05-बुलडाणा, 06-अकोला, 07-अमरावती, 14-यवतमाळ-वाशिम या चारही लोकसभा मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती. त्यानुसार सकाळी सात वाजतापासूनच चारही मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. त्यानंतर मतदानाला वेग आला.

अमरावती विभागातील चारही मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत 6.83 टक्के, सकाळी 11 वाजेपर्यंत 17.76 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 31.04 टक्के, दुपारी 3 वाजेपर्यंत 42.66 टक्के तसेच सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.31 टक्के मतदान झाले.

सायंकाळी 5 वाजेपर्यंत बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 52.24, अकोलामध्ये 52.49 टक्के, अमरावतीत 54.50 टक्के व यवतमाळ-वाशिम मतदारसंघात 54.04 टक्के मतदानाची नोंद झाली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande