जळगाव , 2 ऑक्टोबर (हिं.स.)३५ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना अडावद ता. चोपडा येथील लोखंडेनगरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भगवाननगरमध्ये मोकळ्या जागेवर तरुणाचा खून झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. ही माहिती पोलिसांना कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक राजू थोरात यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. काही वेळात मृत लोखंडेनगरातील बापू हरी महाजन (३५) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या डोक्यावर, तसेच तोंडावर गंभीर जखमेच्या खुणा असून त्याचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून मारेकऱ्यांनी लाकडी दांड्यासह दगडांनी ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी दिला आहे. शव विच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला. मृत बापू महाजन यांच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे. दरम्यान खुनाचा तपास करण्यासाठी जळगाव येथील श्वानपथकाला पाचारण केले. पोलिस कर्मचारी विनोद चव्हाण व प्रशांत कंखरे हे श्वानासह घटनास्थळी दाखल झाले असता, श्वानाने मारेकऱ्यांचा माग दाखविला. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर