भंडारा, 31 मे (हिं.स.) : लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच हुंड्यासाठी सुनेचा व तिच्या माहेरच्यांचा छळ करणाऱ्या नागपूर येथील डेकाटे परिवाराविरोधात भंडारा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात पिडीतेचा पती, नणंद यांचा समावेश आहे.
भंडारा येथील प्रतिक तांबोळी यांची मानसकन्या असलेल्या वैभवीचा विवाह मुदलियार ले-आऊट शांतीनगर नागपूर येथील अभिषेक डेकाटे याच्याशी झाला होता. मुलगा कमावता असून ७ ते १० लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न असल्याचे लग्नापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, अभिषेक कसलाही कामधंदा करीत नसून पूर्णतः आई-वडिलांवर अवलंबून व व्यसनाधीन असल्याचे लग्नानंतर लक्षात आले. फसवणुकीबद्दल वैभवीने सासरच्यांना विचारले असता तिचा छळ सुरू केला. माहेरून पैसे आणायला सांगितले. एवढेच नाही तर, मुलीचा पती आणि सासऱ्याने प्रतिक तांबोळी यांना प्रत्यक्ष भेटून पाच लाखाची मागणी केली. आमचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत. रक्कम न दिल्यास व पोलिसात तक्रार केल्यास मुलीचे बरेवाईट झाले तर तुम्ही जबाबदार राहाल, अशीही धमकी दिली. यानंतर सासू व ननंदेने वैभवीचे सोन्याचे दागिने हिसकावून वडीलांकडून ५ लाख रुपयांची मागणी केली असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसात विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar