नांदेड - लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 53.78 तर विधानसभेसाठी 55.88 टक्‍के मतदान
नांदेड, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व 9 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 3 हजार 88 मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. मतदारांनी मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजेपासून लांबच लांब रांगा लावल्‍या होत्‍या. दिव्‍यांग, जेष्‍ठ मतदारासोब
नांदेड


नांदेड, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व 9 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 3 हजार 88 मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. मतदारांनी मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजेपासून लांबच लांब रांगा लावल्‍या होत्‍या. दिव्‍यांग, जेष्‍ठ मतदारासोबत नवमतदार आणि तृतीयपंथीयांनी मतदानासाठी उपस्थिती लावली. यावर्षी 25 वर्षानंतर एकाच वेळी लोकसभा व विधानसभेसाठी एकाच शाईत दोन मतदान करण्याचा अनुभव मतदाराना मिळाला.

या निवडणुकीत लोकसभेसाठी 19 तर विधानसभेसाठी 165 उमेदवारांचे भविष्य आज मतदान यंत्रात बंद झाले आहे. या लोकसभेसाठी 19 लाखांच्यावर व विधानसभेसाठी 27 लाखांच्यावर मतदारांचा समावेश आहे. आज सकाळी नांदेड जिल्‍ह्यामध्‍ये सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही ठिकाणी सकाळपासूनच मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

नांदेड लोकसभेसाठी आज सकाळी 9 वाजता 6.03 तर विधानसभेसाठी 5.42 टक्के मतदान झाले. सकाळी नांदेड मतदार संघातील लोकप्रतिनिधीनीसह अनेक मान्‍यवरांनी मतदानाचा हक्‍क बजावला. जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सहकुटूंब व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनीही आयटीआय परिसरातील कामगार कल्‍याण केंद्रावर मतदानाचा हक्‍क बजावला. नवमतदार, जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक, तृतीयपंथीय यांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला असून त्यांनी मोठया प्रमाणात मतदानाचा हक्‍क बजावला.

सकाळी 11 वाजेपर्यत लोकसभेसाठी 12.59 तर विधानसभेसाठी 13.67 टक्के मतदान झाले. आज दुपारी 1 वाजता 27.25 तर विधानसभेसाठी 28.15 टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यत लोकसभेसाठी ४१.५८ तर विधानसभा क्षेत्रात ४२.८७ टक्के मतदान झाले होते. सायं. ५ वाजेपर्यत ही आकडेवारी लोकसभेसाठी ५३.७८ तर विधानसभेसाठी ५५.८८ एवढी होती. रात्री उशिरा अधिकृत अंतिम आकडेवारी मिळण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीसाठी गेल्‍या 40 दिवसापासून जिल्‍हा प्रशासन कार्यरत आहे. 15 हजार कर्मचारी तसेच पोलीस व राखीव दलाच्‍या तुकडया गेल्‍या काही दिवसांपासून कार्यरत होत्‍या. आज दिवसभर वॉररुम व वेबकास्टिंग कक्षाच्‍या माध्‍यमातून जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत निवडणूक आयोग व सामान्‍य मतदार यांच्‍या संपर्कात होते. वेब कास्टिंग विभागात वरिष्‍ठ अधिकारी निगराणी ठेवून होते. रात्री उशिरापर्यत या यंत्रणेमार्फत अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर ते लक्ष ठेवून होते.

आज दिवसभर इव्हिएम व अन्‍य कोणतीही अडचण आल्‍यास तातडीने विशिष्‍ट वेळात समस्‍या सोडवली जात होती. विधानसभा निहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या संपर्कात ते होते. मतदान यंत्राच्या बदलाच्या एक दोन घटना वगळता जिल्ह्यामध्ये कुठेही मतदान थांबले नाही. जिल्‍हाधिकाऱ्यांनी यासोबत अनेक केंद्राना अनेक ठिकाणी आकस्मिक भेटी दिल्‍या.तसेच याकाळात निवडणूक निरीक्षकांनी देखील भेटी दिल्या व परिस्थितीवर लक्ष दिले.

रात्री उशिरा नेमकी मतदानाची टक्केवारी पुढे येणार आहे. तत्पुर्वी सन 2019 च्या विधानसभा मतदारसंघात किनवट 70.90, हदगाव 70.20, लोहा 69.73 भोकर-73.99, नांदेड उत्तर 61.20, नांदेड दक्षिण-63.66, नायगाव 73.80, देगलूर 60.80, मुखेड 66.20 असे एकूण 67.83 टक्के मतदान झाले होते. यावेळी देखील मोठया संख्येन मतदान होण्याची अपेक्षा आहे.

यावर्षी निवडणूक विभागाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये महिला, दिव्यांग व तरुण अधिकाऱ्यांचे मतदान केंद्र उभारले होते. याशिवाय 539 पर्दानसिन केंद्र कार्यरत करण्यात आले होते. यासोबतच विष्णुपूरी जि.प. शाळेत पर्यावरण पूरक केंद्र उभारले होते. मात्र सोबतच प्रशासनाने यावेळी प्रत्येक केंद्रामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या होत्या. यामध्ये पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम, दिवाबत्ती, बसण्याची व्यवस्था, काही केंद्रावर सेल्फी पॉईट व अन्य सजावट करण्यात आली होती. मतदारांनी एकाच वेळी दोन ठिकाणी गतीने मतदान झाल्याबद्दल लोकसभा मतदार संघात समाधान व्यक्त केले. मोठया संख्येन जनतेने मतदानाला प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा प्रशासनाने मतदाराचे आभार व्यक्त केले आहे. जिल्ह्यामध्ये याकाळात कोणत्याही अप्रिय घटनेची नोंद नाही.

२३ नोव्हेंबरला मतमोजणी

आज मतदान पार पडल्यानंतर दोन दिवसांनी २३ नोव्हेंबरला शनिवारी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात होणार असून किनवटला आयटीआय कॉलेजमध्ये, हदगावला समाज कल्याण भवन येथील अनुसूचित जातीचे मुलींचे शासकीय वसतीगृह तर लोहा येथे महसूल हॉल, तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande