• नागरिकांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रशासनाचे कौतूक
• मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करणाऱ्या मतदारांचे भूषण गगराणी यांनी मानले आभार
मुंबई, 20 नोव्हेंबर (हिं.स.) - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ साठी मुंबईत आज (२० नोव्हेंबर) मतदान सुरळीतपणे पार पडले. मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून पुरविण्यात आलेल्या विविध नागरी सेवासुविधांनी मुंबईतील मतदार सुखावल्याचे चित्र दिसून आले. तर, मतदान केंद्रांवर उत्तम प्रकारच्या सेवासुविधा पुरविल्याबद्दल नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रशासनाचे कौतूक केले. दरम्यान, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी मुंबईकर मतदारांचे आभार मानले आहेत. मतदानाचा हक्क बजावून नागरिकांनी लोकशाही अधिक बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे, पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अविरत आणि अथक कर्तव्य बजावणाऱ्या सर्व यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही कौतूक आहे, अशी भावना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण ३६ मतदारसंघांसाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत मतदान प्रक्रिया आज (दिनांक २० नोव्हेंबर २०२४) पार पडली. प्रथमच या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकारीपदाची संयुक्तपणे जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी म्हणाले की, माननीय भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य), मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनासोबतच विविध तपास यंत्रणा, मुंबई पोलिस आणि अन्य सर्व यंत्रणांच्या सहकार्याने आणि समन्वयामुळे मुंबईतील मतदान अत्यंत चोख आणि सुरळीतपणे पार पडले. मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावणारे निवडणूक अधिकारी, केंद्रस्तरीय कर्मचारी, मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा व्यवस्थेत अहोरात्र तैनात असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा आर्थिक गैरव्यवहार होऊ नये, यासाठी मुंबईत कार्यरत सर्व महसूली तसेच गुप्तचर यंत्रणा, मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष सोयीसुविधा उपलब्ध करुन देणारे प्रशासनातील अधिकारी तसेच त्यांची देखभाल करणारे विविध विभागांचे कर्मचारी, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करणारे अधिकारी-कर्मचारी, बचत गट, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांचे स्वयंसेवक, आपदा मित्र, दिव्यांग मित्र यांच्यासोबतच या संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांच्या योगदानामुळे मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. यासाठी यंत्रणेतील प्रत्येकांचे कौतूक असल्याची भावनाही श्री. गगराणी यांनी व्यक्त केली.
प्रशासनाने आपल्या वतीने मतदानासाठी विविध सोयीसुविधांची पूर्तता करून मतदान प्रक्रिया राबविली असली तरीसुद्धा ही प्रक्रिया मतदारांनी दिलेल्या प्रतिसादावर अवलंबून असते. मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व ३६ मतदारसंघांतील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. यासाठी मी मुंबईतील प्रत्येक मतदाराचे आभार मानतो, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गगराणी म्हणाले.
विविध संकल्पनांमध्ये साकारले मतदान केंद्र, मतदारांचे जोरदार स्वागत
प्रशासनाच्या वतीने मुंबईतील विविध मतदारसंघांमध्ये ८४ मॉडेल मतदान केंद्र उभारण्यात आले होते. त्यामध्ये संपूर्णत: युवा कर्मचाऱ्यांद्वारा संचालित, महिलांद्वारा संचालित तसेच दिव्यांगाद्वारा संचालित मतदान केंद्रांचा समावेश होता. विलेपार्ले येथील संत झेवियर माध्यमिक शाळेत सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. हे संपूर्ण मतदान केंद्र फुलांनी सजविण्यात आले होते. तर, अनेक ठिकाणी मतदारांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.
मतदारांच्या मदतीला सुमारे ७ हजार स्वयंसेवक
मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी मतदाराच्या मदतीसाठी ७ हजार ११५ स्वयंसेवक विविध मतदान केंद्रांवर कार्यरत होते. यामध्ये ९८ महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेत (एनएसएस) सहभागी २ हजार ८०० विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) ७५० विद्यार्थी, नागरी संरक्षणातील ३२३ सदस्य, आपदा मित्र/सखी २००, नेहरू युवा केंद्राचे ३८ सदस्य आणि अन्य ३ हजार ००४ सदस्य यांचा समावेश होता. या स्वयंसेवकांनी मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांना सहाय्य, रांगांचे व्यवस्थापन आदी जबाबदाऱ्या योग्यपणे पार पाडल्या.
मतदानासाठी नामवंत मान्यवरांची मांदियाळी, सोयीसुविधांबाबत प्रशासनाचे कौतूक
विधानसभा निवडणूक-२०२४ साठी मुंबईत महिला, पुरुष, नवमतदार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आदींमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. यासोबतच, चित्रपट, कला, क्रीडा, राजकीय, प्रशासन आणि अन्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी मुंबईत विविध ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन, भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर, राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, मुंबईचे पोलिस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, गायिका श्रीमती आशा भोसले, गीतकार व पटकथा लेखक श्री. जावेद अख्तर, सिनेसृष्टीतील श्री. परेश रावल, श्रीमती हेमा मालिनी, श्री. राकेश रोशन, श्री. अक्षय कुमार, श्रीमती माधुरी दीक्षित, श्रीमती सोनाली बेंद्रे, श्री. कार्तिक आर्यन, श्री. राजकुमार राव, श्री. सचिन पिळगावकर, श्रीमती सुप्रिया पिळगावकर, श्री. अभिजीत खांडकेकर, श्रीमती सुखदा खांडकेकर, श्रीमती अनिता दाते-केळकर, श्री. अविनाश नारकर, श्रीमती ऐश्वर्या नारकर, श्रीमती महिमा चौधरी, श्रीमती शमिता शेट्टी, सिनेदिग्दर्शक श्री. रोहित शेट्टी, हास्यकलाकार श्री. समीर चौघुले, श्री. गौरव मोरे, दिव्यांग अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ता श्री. नीलेश सिंगित आदींनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, मतदान केंद्रांवर प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात आलेल्या विविध सोयीसुविधांचे विविध मान्यवरांनी कौतूक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी