रत्नागिरी, 20 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांसह गुणवत्ता पारितोषिक प्रदान सोहळा येत्या रविवारी (दि. २४ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे.
समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर उपस्थित राहणार असून “प्रवास : एक अभ्युदयाचा मार्ग” या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे.
नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी आतापर्यंत १४ कादंबऱ्या, ७ संगीत नाटके, ३ गद्यनाटके, २ दीर्घ कथासंग्रह २ काव्यसंग्रह, ३ ललित लेख संग्रह लिहिले आहेत. नाटकांनी संगीत रंगभूमीला संजीवनी देण्याकरिता भरीव योगदान केले. त्यांना या साहित्यसेवेसाठी त्यांना १६ पुरस्कार मिळाले असून विविधांगी लेखन ते करत आहेत. राज्य संगीत नाट्य स्पर्धेत नाट्यलेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. ॲड. प्रिया लोवलेकर १९९७ पासून वकिली सेवेत आहेत. त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बाल कल्याण समिती, जिल्हा महिला दक्षता समिती, विशेष बाल पोलीस पथक अशासकीय सदस्य, बाल न्याय मंडळ अशा विविध ठिकाणी कार्य केले आहे. आता त्यांची महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्यपदी निवड झाली आहे, त्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
संपूर्णतः नर्मदा परिक्रमा पदयात्री मंदार खेर, बालगंधर्व रंगसेवा पुरस्कार विजेते राजाराम शेंबेकर, सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या पहिल्या महिला अध्यक्ष सीए. सौ. अभिलाषा मुळ्ये यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राज्य संगीत नाट्यस्पर्धा यशस्वी कलाकारांचे मार्गदर्शक विलास हर्षे, राज्य संगीत नाट्य स्पर्धा संगीत दिग्दर्शन द्वितीय क्रमांक रामचंद्र तांबे, राज्य संगीत नाट्य स्पर्धा तबलावादनात द्वितीय क्रमांक प्राप्त अथर्व आठल्ये, राज्य संगीत नाट्य स्पर्धेत गायन रौप्यपदक पटकावणारी सावनी शेवडे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
याशिवाय राज्य संगीत नाट्य स्पर्धेत अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त गुरुप्रसाद आचार्य व सौ. देवश्री शहाणे, ऑर्गनवादनात प्रथम क्रमांक हर्षल काटदरे, अखिल भारतीय सांस्कृतिक राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त स्वरदा लोवलेकर आणि अष्टपैलू कामगिरीबद्दल आदर्श विद्यार्थी पुरस्कारप्राप्त रुद्रांश लोवेलकर यांना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना विविध पारितोषिकांनी गौरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर