रत्नागिरी, 21 जानेवारी, (हिं. स.) : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसचे इंजिन रत्नागिरी ते करबुडे दरम्यान बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक तासभर विस्कळित झाली. गाडीला नवीन इंजिन जोडण्यात आल्याने एका तासाने या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले. कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस रेल्वे गाडी रत्नागिरी करबुडे दरम्याने आली असता या गाडीचे इंजिन अचानक बंद पडले. हा प्रकार आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या ठिकठिकाणी थांबवण्यात आल्या. इंजिन नादुरुस्त झाल्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एका तास खोळंबा झाला. रत्नागिरी रेल्वेस्थानकातून नवीन इंजिन मागवण्यात येऊन गाडी एका तासानंतर मार्गस्थ करण्यात आली. गाडीला दुसरे इंजिन जोडल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी