रत्नागिरी, 21 जानेवारी, (हिं. स.) : नौकांचे फायबर साचे तयार करणे, साच्यापासून नौका बनविणे, त्यावर डेक व केबिन तयार करणे, तसेच डेकवर विविध प्रकारची मासेमारी साधने बसविणे आणि इंजिन व त्यांची उपकरणे बसवून नौका कार्यान्वित करणे याचा प्रत्यक्ष व्यावहारिक अनुभव डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी घेत आहेत.
फिशिंग बोट कन्स्ट्रक्शन अँड मरीन इंजिन या विषयांतर्गत फायबर ग्लास मासेमारी नौका बांधणी तंत्रज्ञानाच्या सखोल अभ्यासासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे आणि सहयोगी अधिष्ठाता (कृषी तंत्रज्ञान शिक्षण) डॉ. ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक कंपनीत विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यासाठी विष्णू नाईक, नवीन नाईक, सचिन नाईक, लक्ष्मीकांत नाईक, विक्रांत कुळदणकर, संतोष प्रभुळकर मार्गदर्शन करीत आहेत.
या प्रशिक्षणामध्ये पौरस घडी, प्रथम गोलटकर, ओजस भरणकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक नीलेश मिरजकर, प्राचार्य डॉ. आशीष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी