'जिप्सी'साठी शशि चंद्रकांत खंदारेना 'इफ्फी'चे नामांकन!
मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।गोव्यात होत असलेल्या यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (इफ्फी) यंदापासून पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी सात चित्रपट स्पर्धेत असून पुरस्क
जिप्सी


मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।गोव्यात होत असलेल्या यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (इफ्फी) यंदापासून पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी सात चित्रपट स्पर्धेत असून पुरस्काराच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय चित्रपटांना शशि चंद्रकांत खंदारे यांनी दिग्दर्शित केलेला 'जिप्सी' हा चित्रपटही टक्कर देणार आहे.

'इफ्फी' हा केंद्र सरकारचा अधिकृत चित्रपट महोत्सव आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या महोत्सवाला विशेष प्रतिष्ठा आहे. यंदा या महोत्सवाचे ५५वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर, यंदापासून महोत्सवात पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. त्यात पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय दिग्दर्शकांचे चित्रपटांचा समावेश आहे. या विभागातील विजेत्याला मानाचा रौप्य मयूर, १० लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली सिंगापुरचे दिग्दर्शक आणि पटकथाकार अँथनी चेन, अमेरिकन-ब्रिटीश चित्रपट निर्मात्या एलिझाबेथ कार्लसन, स्पॅनिश निर्माते फ्रान बोर्गिया तसेच ऑस्ट्रेलियाचे संकलक जिल बिलकॉक या ख्यातनाम मान्यवरांचे परीक्षक मंडळ विजेत्याची निवड करणार आहे.

विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी नामांकन मिळालेला 'जिप्सी' हा एकमेव मराठी चित्रपट आहे. 'बोलपट निर्मिती' या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या पूर्वी राज्य शासनाने प्रतिष्ठेच्या कान महोत्सवात पाठवलेल्या तीन मराठी चित्रपटांमध्येही 'जिप्सी' या चित्रपटाचाही समावेश होता. त्यामुळे कान महोत्सवा पाठोपाठ इफ्फीसारख्या मोठ्या महोत्सवाचा मान 'जिप्सी' चित्रपटाला मिळाला आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande