अमरावती 21 नोव्हेंबर (हिं.स.)
स्थानिक गोपालनगर येथील भारतरत्न राजीव गांधी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ईव्हीएम दुचाकीवरून नेण्याचा आक्षेपार्ह प्रकार घडल्याचा आरोप करीत नागरिकांनी गोंधळ घातला. काही क्षणातच याठिकाणी विभागीय आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेकडोच्या संख्येने नागरिक जमा झाले. रात्री ९ वाजतापासून सुरू झालेला हा गोंधळ रात्री साडे अकरापर्यंत सुरू होता. उमेदवारांनी प्रशासकीय यंत्रणेवर ताशेरे ओढत कारवाईची मागणी केली.
गोपालनगर येथील भारतरत्न राजीव गांधी उच्च प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर पाच मतदान खोल्या होत्या. यामध्ये चार ईव्हीएम ठेवण्यात आल्या. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ईव्हीएम मशीन पोलीस बंदोबस्तामध्ये स्ट्राँग रूमकडे नेल्य जाणार होत्या, मात्र या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन दुचाकीवरून नेण्यात येत असल्याचे स्थानिक देशमुख आडनावाच्या नागरिकाला दिसून आले. त्याने याबाबत विचारणा करीत गोंधळ घातला. स्थानिकांनुसार संबंधित अधिकारी मद्यपान करून होता, ईव्हीएम पेटी तिथेच टाकून त्याने पळ काढला. नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला व ईव्हीएम मशीनची पेटी मतदान केंद्रावर नेली. या घटनेनंतर उमेदवार प्रीती बंड, युवातुषार भारतीय, आमदार रवी राणा, स्वाभिमान पार्टीची सुमतीताई ढोके, माजी नगरसेवक सुनील काळे यांच्यासह त्यांचे समर्थक आणि नागरिक शेकडोंच्या संख्येने जमा झाले. स्थानिकांनी ईव्हीएम सुरक्षित नाहीत, हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करीत मतदान केंद्राध्यक्षाविरुद्ध कारवाईची मागणी केली. पोलीस बंदोबस्ताअभावी हा प्रकार घडला, असा आरोप काहींनी केला तर काहींनी ईव्हीएम दुचाकीवरून नेण्यावरच आक्षेप घेत प्रशासकीय यंत्रणेवर ताशेरे ओढले. या घटनेनंतर उमेदवार तुषार भारतीय, प्रीती बंड, आमदार रवी राणा आपल्या समर्थकांसह दाखल झाल्याने पोलीसांची अतिरिक्त कुमक बोलाविण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी मतदान केंद्राला भेट देऊन वस्तूस्थिती जाणून घेतली. भारतरत्न राजीव गांधी शाळा ही गोपालनगर-सुतगिरणी या मुख्य मार्गावरून आंत अंतर्गत लहान रस्तावर आहे. तेथपर्यंत मोठी वाहने पोहोचणे कठीण असते. परिणामी मोठी वाहने मुख्य रस्त्याच्या कडेला उभे करण्याशिवाय पर्याय नसतो. संबंधित कर्मचारी ईव्हीएम मुख्य रस्त्यापर्यंत दुचाकीवरून घेऊन जात असावेत, असाही एक सूर यासंदर्भात ऐकायला मिळाला.त्यानंतर रात्री जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याचे पत्र काढले व प्रकरण शांत झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी