रत्नागिरी, 29 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात त्रेसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू आहे. स्पर्धेत तिसऱ्या दिवशी पाली येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ व इतर देवस्थान संस्थेने सादर केलेले अखेरचा सवाल हे नाटक हाऊसफुल्ल गर्दी सादर झाले.
वसंत कानेटकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले हे नाटक जयप्रकाश पाखरे यांनी दिग्दर्शित केले.
हे नाटक एका सत्य घटनेवर आधारित आहे. ज्या काळात हे नाटक लिहिले गेले, त्यावेळची कॅन्सर या आजारावरील औषधोपचार पद्धती, या आजारामुळे त्या कुटुंबातील सदस्यांची झालेली मानसिकता यांचे चित्रण नाटकात आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामुळे केवळ अठरा वर्षांच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होते. हे जेव्हा या घराशी जोडलेल्या बाहेरच्या लोकांना कळते, तेव्हा त्या मुलीशी वागण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन बदलतो. एका आईची मुलीला वाचवण्याची धडपडसुद्धा पाहायला मिळते. करोनानंतर कॅन्सरचे प्रमाण आज वाढल्याचे पाहायला मिळते. अशा वेळी कॅन्सरच्या रोग्याशी घरातील माणसांनी कसे वागावे, हेदेखील नाटक सांगून जाते. औषधाबरोबरच देवावर श्रद्धा असणेसुद्धा आवश्यक असल्याचा संदेश नाटकात आहे. कॅन्सर झालेल्या त्या मुलीचे निधन होते, की उपचारांनंतर हजारात वाचणारी ती रुग्ण ठरते, या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांवर सोपवून नाटक समाप्त होते. नाटक संपल्यानंतर राष्ट्रगीत आणि सर्व कलाकारांनी प्रेक्षकांना केलेले वंदन वेगळे वाटले.
नाटकाचे दिग्दर्शन चांगले झाले. डॉ. मुक्ताबाई झालेल्या सौ. समीक्षा दत्तात्रय सावंतदेसाई यांनी डॉक्टरी पेशा आणि आतून खचून गेलेली आई दोन्ही भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. हरिभाऊ (संजय रामचंद्र शेलार), गंगाराम (चि. श्रीश महेश पाखरे) यांनी आपापल्या भूमिका चांगल्या वठवल्या आहेत. डॉ. दुभाषी (राजेंद्र अनंत सावंत), देवदत्त (जयप्रकाश गणपत पाखरे) आणि नंदू (कु. अनुजा दिलीप सावंत) या अन्य प्रमुख पात्रांनी चांगली साथ दिली आहे. जयसिंह (संकेत संतोष साळवी), राजीव (महेश गणपत पाखरे), हेमा (सौ. श्रद्धा चंद्रशेखर सुर्वे) अशा प्रत्येक पात्राने आपल्याला मिळालेल्या भूमिकेचा आब राखून अभिनय केला. नाटकातील नंदूचा भाऊ मात्र तरुण वाटत नव्हता. त्याचा आवाजही तरुणाला साजेसा वाटला नाही.
पार्श्वसंगीत (कु. पूर्वा प्रदीक कांबळे), प्रकाशयोजना (प्रथमेश शरद चव्हाण), नेपथ्य-रंगभूषा (सत्यजित विश्वास गुरव) या तांत्रिक बाजूही चांगल्या होत्या. संगीत आणि प्रकाशयोजना आवश्यक त्या प्रमाणात केल्याचे दिसून आले. डॉक्टर आणि वकील यांच्या घरातील वातावरणाला साजेसे नेपथ्य करण्यात आले होते. मात्र दोन प्रसंगांमध्ये काही वेळा दोन मिनिटांपर्यंतचा वेळ पूर्ण काळोखात किंवा पूर्ण प्रकाशात गेला आहे. ती वेळ साधून घेता आली असती.
या नाटकाची एकूण १७ हजार ८२५ रुपयांची तिकीट विक्री झाली. तिकीट धारक ८३५, सन्मानिका धारक ४३, तर ७ पत्रकारांसह एकूण ८८५ प्रेक्षक नाटकाला उपस्थित होते. उच्चांकी तिकीटविक्रीमुळे स्पर्धेच्या काळात प्रथमच नाट्यगृह हाऊस फुल्ल झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर