नाशिक, 29 नोव्हेंबर (हिं.स.)।
तालुक्यातील तपनपाडा दुधखेड शिवारात शेतात अंमली पदार्थ गांजाची शेती केली जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व वडनेरभैरव पोलीस पथकाने रवींद्र नामदेव गांगुर्डे (४०) या शेतकऱ्याच्या शेतावर छापा मारत १२ लाख ९३ हजार रुपये किमतीची २१५ किलो वजनाची ६५ झाडे जप्त करत त्यास अटक केली.
तपनपाडा दुधखेड शिवारात असलेल्या स्वमालकीच्या शेतात संशयीत रवींद्र गांगुर्डे हा गांजाची शेती करत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेरभैरव पोलिसांनी गांगुर्डेच्या शेतात छापा टाकला असता तेथे गांजाची झाडे आढळून आली. सदर छाप्यात २१५ किलो वजनाची ६५ गांजाची झाडे किंमत १२ लाख ९३ हजारांचा अवैध साठा जप्त करण्यात आला. गांगुर्डे हा स्वतःच्या शेतात टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडांची बेकायदेशीररीत्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशाने जोपासना करताना मिळून आल्याने त्याच्याविरोधात वडनेरभैरव पोलीसात एन.डी.पी.एस. कायदा कलम २०, २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांगुर्डे हा गांजाच्या झाडांची लागवड करून त्याची विक्री कोठे व कोणास करणार होता याबाबत सखोल तपास पोलिसांतर्फे केला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, वडनेरभैरव पो.स्टे. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, उपनिरीक्षक प्रकाश जाधव, नवनाथ सानप, हवा. सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, सतीश जगताप यांच्या पथकाने कारवाई केली.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI