वॉशिग्टन, 06
नोव्हेंबर (हिं.स.) : अमेरिकन
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. त्यांनी इलेक्टोरल
कॉलेजचा 270 मतांचा आवश्यक असलेला आकडा गाठला आहे. मात्र, अद्यापनिवडणुकीचा अधिकृत नकाल जाहीर झालेला नाही. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील हे जवळपास स्पष्ट झालेय.
ट्रम्प आता पुन्हा
एकदा दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होत आहेत. ते अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
असतील. रिपब्लिकन पक्षाने 2015 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प
यांच्या नावाची उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत
डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
मात्र, 2020 मध्ये ते पराभूत झाले होते. आता 2024 मध्ये ते पुन्हा विजेयी
झाले आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेत मतदानाला सुरुवात
झाली. बुघवारी पहाटे मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी 1 वाजेच्या सुमारास निकाल
स्पष्ट झाले. रिपब्लिकन पक्षाला अमेरिकेत बहुमत मिळालें आहे. त्यामुळे डोनाल्ड
ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेच्या ओहियो
प्रांतात डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य शेरॉड ब्राऊन यांचा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार
बर्नी मोरेनो यांच्याकडून पराभव झाला. त्याआधी वेस्ट व्हर्जिनियाचे रिपब्लिकन
पक्षाचे उमेदवार जिम जस्टिस यांनी सहज विजय मिळवल्यानंतर या दोन जागांमुळे डोनाल्ड
ट्रम्प यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. विस्कॉन्सिन, पेनसिल्वानिया आणि
मिशिगन या ठिकाणी डेमोक्रॅटिक पक्षाकडून कडवी झुंज पाहायला मिळाली.जिम जस्टिस यांच्या विजयामुळे डेमोक्रॅटिक पक्षाकडची वेस्ट
व्हर्जिनियाची जागा रिपब्लिकन पक्षाकडे आली. त्याशिवाय टेक्सास आणि फ्लोरिडातील
टेड क्रुझ व रिक स्कॉट या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे
डेमोक्रॅट्सचे प्रयत्न धुळीला मिळाले.
आता आपण आपला देश
कधीच नव्हता इतका उत्तम बनवणार आहोत. हे यश आपल्या सगळ्यांना एकत्र आणणार आहे.
आपल्याला सर्व समस्या सोडवायच्या आहेत. आपण सगळे मिळून अमेरिकेला पुन्हा महान बनवू
शकतो. त्यामुळे मला हे संगण्यात अतिशय आनंद होतोय की हे करणं ही माझ्यासाठी
अभिमानास्पद बाब आहे. मी तुमचा अपेक्षाभंग करणार नाही. अमेरिकेचं भविष्य आणखी
विशाल, आणखी चांगलं, आणखी श्रीमंत आणि आणखी सामर्थशाली असेल. देव
तुम्हा सर्वांवर कृपा करो”, असं डोनाल्ड ट्रम्प आपल्या विजयी भाषणात म्हणाले.
दरम्यान, या भाषणात डोनाल्ड
ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांचा ‘नवा तारा’ असा उल्लेख करत
त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानले. फ्लोरिडात झालेल्या वेस्ट पाम
बीच परिसरात ट्रम्प यांनी केलेल्या भाषणात त्यांनी एलॉन मस्क यांचा उल्लेख केला. आपल्याकडे
एलॉन मस्क यांच्या रुपात एक नवा तारा आहे. ते अत्यंत हुशार आहेत. आपल्या अशा हुशार
लोकांचं आपण जतन केलं पाहिजे. असे खूप कमी लोक आहेत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी