अदिस अबाबा , 30 डिसेंबर (हिं.स.)।आफ्रिकन देश इथियोपियामध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशाने भरलेला ट्रक नदीत पडून अपघात घडला आहे. या अपघातात ६० जणांचा मृत्यू झाला आहे.तर या ठिकाणी अजूनही बचावकार्य सुरु आहे.
दक्षिणी सिदामा क्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात बोना जिल्ह्यात घडला. अपघातात जखमी झालेल्यांवर बोना जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सरकारी मालकीच्या इथियोपियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, सर्व लोक एका लग्न समारंभात सहभागी होणार होते.
सर्व लोक इसुझू ट्रकमधून प्रवास करत होते. मात्र अचानक ट्रक रस्ता चुकला आणि नदीत पडला. या नदीत अजूनही शोध मोहिम सुरूच आहे. स्थानिक लोक आणि सरकारी विभाग मदत आणि बचाव कार्य करत आहेत.
इथिओपियामध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खराब ड्रायव्हिंग, जीर्ण वाहने सुरक्षित वाहतुकीसाठी सर्वात मोठा अडथळा आहेत.२०१८ मध्ये इथिओपियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती. या अपघातात विद्यार्थ्यांनी भरलेली बस खड्ड्यात पडली, यात ३८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash