न्यू ऑर्लिन्स येथे उत्सवाच्या गर्दीत ट्रक चालवला
न्यूयॉर्क, 01जानेवारी (हिं.स.) : अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात बुधवारी दहशतवादी हल्ला झाला. यात हल्लेखोराने नवीन वर्षाचा उत्सव साजरा करणाऱ्या लोकांवर पिकअप ट्रक चालवला. बोर्बन रस्त्यावर घडलेल्या या घटनेंतर ट्रकमधील हल्लेखोराने लोकांवर अंधाधुंद गोळीबार देखील केला. यामध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 जण जखमी झाले आहेत.
या हल्ल्याबाबत प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार न्यू ऑर्लिन्समधील बोर्बन रस्त्यावर नवीन वर्षाचा उत्सव साजरा होत असताना एक वेगवान वाहन गर्दीत घुसले. यानंतर एक व्यक्ती त्यातून खाली उतरली. त्याने लोकांवर गोळीबार सुरू केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिस दलालाही गोळीबार करावा लागला. पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर ठार झाल्याचे बोलले जाते. परंतु, त्यासंदर्भात कुठलेही अधिकृत वक्तव्य पुढे आलेले नाही. ही घटना अपघात नसून मुद्दाम करण्यात आलेला हल्ला असल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पोलिसांनी जखमींना तत्काळ शहरातील 5 रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे.
यापूर्वी जर्मनीतही 25 डिसेंबर रोजी असाच प्रकार घडला होता. मॅग्डेबर्ग शहरातील बाजारपेठेत सौदीतील एका डॉक्टरने लोकांवर कार चालवली होती. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले झालेत.
------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी