नवी दिल्ली, 14 डिसेंबर (हिं.स.) : देशाच्या राज्यघटनेला 25 वर्षे पूर्ण झाली असताना आणिबाणी लावण्यात आली. राज्यघटनेवरील हा सर्वात मोठा हल्ला आणि मुस्कटदाबी होती अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. संविधानाला 75 वर्षे झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान बोलत होते.
आपल्या भाषणात विविध मुद्यांना स्पर्श करताना पंतप्रधान म्हणाले की, भारत हा लोकशाहीची जननी म्हणून ओळखला जातो. जेव्हा संविधानला 50 वर्षे लागली तेव्हा अटलबिहारी वाजपेयींनी देशाला एकतेचा संदेश दिला. आणि आता संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत अशावेळी आम्ही गेल्या 10 वर्षात संविधान बळकट केले. भाजपा सरकारने या देशातल्या सामान्य लोकांसाठी वन नेशन वन हेल्थ कार्ड, त्याचबरोबर वन नेशन वन रेशन, यासारख्या सामान्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या. काँग्रेसच्या काळात सांविधानीक व्यवस्थांची मुस्कटदाबी झाली होती. काँग्रेसच्या एका कुटुंबाकडून संविधानाला वारंवार धक्का पोहचवला गेला.त्यांनी केलेल्या पापाला कोणीही माफ करणार नाही मनमोहन सिंग यांनी काढलेला आदेश राहूल गांधी यांनी फाडला हा संविधानाचा अपमान नाही का ? असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.
भारतीय राज्यघटना स्वीकारून 75 वर्षे पूर्ण झाले आहेत. आपल्याकडे 25 वर्षाचे देखील एक महत्व असते. तसेच 50 वर्षाचे आणि 60 वर्षाचे देखील एक महत्व असते. मात्र, आपण जर इतिहासाकडे ओळून पाहिलं तर जेव्हा देश संविधानाचे 25 वर्ष पूर्ण करत होता तेव्हा आपल्या देशात संविधान हटवण्याचा प्रयत्न झाला. भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. सर्व संविधानिक व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. देशाला एकप्रकारे जेलखाना बनवण्यात आले होते. सर्वांचे हक्क हिरावून घेतले गेले होते. प्रेसच्या स्वातंत्र्यावर टाळे लावले गेले. मात्र, काँग्रेसच्या डोक्यावर लागलेलं हे पाप कधीही धुतले जाणार नाही. जगभरात जेव्हा-जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा-तेव्हा हे काँग्रेसच्या डोक्यावरचं हे पाप दिसेल, अशी टीका त्यांनी केली. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बांडकरांबाबत भाष्य करताना मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या मनात बाबासाहेबांबद्दल देखील कटुता होती. अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात चैत्यभूमीवर स्मारकाचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, त्यानंतर पुढीचे 10 वर्षे यूपीए सरकारने हे काम पूर्णत्वास जाऊ दिले नाही. त्यानंतर आमच्या पक्षाच्या सरकारने हे काम पूर्णत्वास नेल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले होते की, मला हे मान्य करावे लागेल की पक्षाध्यक्ष हे सत्तेचे केंद्र आहे आणि सरकार पक्षाला उत्तरदायी आहे. इतिहासात पहिल्यांदाच संविधानाला एवढा मोठा धक्का बसला. राष्ट्रीय सल्लागार परिषदेला पंतप्रधानापेक्षा वरचं स्थान सोनिया गांधींना देण्यात आले होते.” दरम्यान, राहुल गांधींवर बोलताना मोदींनी त्यांचा उल्लेख अहंकारी असा केला. “एका अहंकारी व्यक्तीने मंत्रिमंडळाचा निर्णय फाडला आणि त्यानंतर मंत्रिमंडळाने देखील निर्णय बदलला. ही कसली व्यवस्था आहे..? जेव्हा एखाद्या अहंकारी व्यक्तीने मंत्रिमंडळाचा निर्णय फाडला आणि मंत्रिमंडळाचा निर्णय बदलला”, असं म्हणत पंतप्रधानांनी गांधी कुटुंबियांवर जोरदार टीका केली.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी