राज्य मंत्रिमंडळाचे रखडलेले खातेवाटप अखेर जाहीर
नागपूर, 21 डिसेंबर (हिं.स.) : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर अखेर आज, शनिवारी राज्य मंत्रिमंडळाचे रखडलेले खातेवाटप जाहीर झाले. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृह आणि ऊर्जा विभाग राहणार असून अजित पवारांकडे अर्थ खाते आणि एकनाथ शिंदेंना नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात महायुतीला एकहातील विजय मिळाला होता. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे व अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबर रोजी नागपुरात करण्यात आला. यावेळी एकूण 39 मंत्र्यांचा नागपूरच्या राजभवनात शपथविधी झाला. परंतु, बिनखात्याच्या मंत्र्यांनीच 16 ते 21 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन पार पाडले. आता अधिवेशन आटोपल्यानंतर आज, शनिवारी रात्री खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि अजित पवारांना अर्थ खाते देण्यात आले असून फडणवीस यांनी गृह तसेच ऊर्जा विभाग स्वतःकडेच ठेवला आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे (महसूल), शिवेंद्र राजे भोसले (सार्वजनिक बांधकाम), उदय सामंत (उद्योग), संजय राठोड (माती व पाणी परीक्षण ), गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा), प्रकाश आबीटकर (सार्वजनिक आरोग्य ), हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण), भरतशेठ गोगावले (रोजगार हमी), नरहरि झिरवळ (अन्न व औषध प्रशासन), चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कामकाज), पंकजा मुंडे-पालवे (पर्यावरण), आदिती तटकरे (महिला व बालविकास), दत्ता भरणे (क्रीडा), राधाकृष्ण विखे-पाटील (जलसंधारण - गोदावरी व कृष्णा खोरे विकास), गिरीश महाजन(जलसंधारण : विदर्भ तापी कोकण विकास) व आपत्ती व्यवस्थापन, निलेश राणे (मत्स्य, बंदरे), बाबासाहेब पाटील (सहकार), संजय शिरसाट (सामाजिक न्याय), माणिकराव कोकाटे (कृषी), धनंजय मुंडे (अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण), मकरंद पाटील (मदत व पुनर्वसन) , आकाश फुंडकर (कामगार), गणेश नाईक (वन), दादा भुसे (शालेय शिक्षण) तसेच मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास, रोजगार उद्योग व संशोधन विभागाची जबाबदारी देण्यात आलीय. यासोबतच राज्यमंत्र्यांचेही खातेवाटप जाहीर झाले असून यात माधुरी मिसाळ (सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण ), आशिष जयस्वाल (अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय ), मेघना बोर्डीकर (सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा) इंद्रनील नाईक (उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन ), योगेश कदम (गृहराज्य शहर ) आणि पंकज भोयर (गृहनिर्माण) अशी जबाबदारी सोपवण्यात आलीय.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी