पुणे, 21 डिसेंबर (हिं.स.) - परदेशात जाणाऱ्या भारतीयांकडे 'ब्रेन ड्रेन' म्हणून न पाहता संस्कृतीचे राजदूत म्हणून पहायला हवे. कुठेही जा पण भारतीयत्व हृदयात हवे. कारण संपूर्ण जगाला आता भारतीय नेतृत्वाची गरज आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी व्यक्त केला.
पुणे पुस्तक महोत्सवात आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये लेखक डॉ. नरेंद्र पाठक यांनी आंबेकरांशी संवाद साधला. 'आरएसएस अॅट १००' या विषयावर ते बोलत होते. त्यांनी संघ, हिंदुत्व, समाज आणि रा.स्व. संघाच्या शताब्दीनमित्ती संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मराठे यांनी ग्रंथभेट देऊन आंबेकरांचे स्वागत केले.
भारतीयांची बुद्धी आणि क्षमतेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विश्वास आहे. त्यामुळे आगामी काळात केवळ संघानेच नव्हे तर समाजानेही सामाजिक परिवर्तनात सहभागी व्हायला हवे असे सांगत त्यांनी रा.स्व. संघाच्या शताब्दी वर्षाचा प्रवास उलगडला. नागरी कर्तव्य, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन आणि 'स्व' जागरण या पंचपरिवर्तनाची मांडणी त्यांनी यावेळी केली.
हिंदू स्वयंपूर्ण आणि सक्षम बनवत सामाजिक परिवर्तन साधण्याची कल्पना असल्याचे आंबेकरांनी सांगितले. ते म्हणाले, समाजाची स्वतःची व्यवस्था सक्रीय व्हायला हवी. शाखेच्या माध्यमातून परिसरातील उपक्रम आणि सामाजिक क्षेत्रात संघ स्वयंसेवक सहभागी होतात. संघ शताब्दी निमित्ताने शाखांचे जाळे वाढवत अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न निरंतर चालू आहे. समाजातील सर्व संघटना आणि संस्थांशी संपर्क करत सज्जनशक्तीला सामाजिक परिवर्तनात सहभागी करण्यात येत आहे. आपण जिथे आहोत. ज्या क्षेत्रात आहोत तेथून उन्नतीसाठी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.
हिंदुत्व म्हणजे एकत्व
शब्दशः अर्थ घेतला घेतला तर हिंदुत्व म्हणजे एकत्व आहे.जगात प्रत्येक जण आपले वेगळेपण शोधत आहे. मात्र आपला दृष्टीकोन हा प्रत्येकात समानत्व शोधण्याचा आहे. आपण जरी वेगळे दिसत असलो तरी आतून एक आहोत. हिच भारतीय विचारांच्या एकत्वाची धारा आहे. ती संस्कृती, लोकजीवन, व्यवस्था आणि जागतिक दृष्टीकोणातून व्यक्त होते. काळाच्या ओघात काही लोक हिंदुत्व विसरले असले तरी मागील १०० वर्षे संघ याच मेमरी रिकव्हरीचे काम करत आहे.
मातृत्वकाळात 'वर्क फ्रॉम होम'ची गरज
शहरी जीवनात मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी सुक्ष्म कुटुंब निर्माण होते. एकापेक्षा जास्त मुलांसाठी मानसिकता कशी निर्माण करावी, असा प्रश्न विचारले असता. सुनील आंबेकर म्हणाले, मुले किती असावीत हे त्या परिवाराने ठरविण्याचा विषय आहे. मात्र हे ठरविताना देशाची आवश्यकता आणि परिस्थितीचे भान असायला हवे. ज्या देशातील जनसंख्या असंतुलीत होते. त्या देशाचे भविष्य बदलते. जनसंख्येच्या संतुलनासाठी धोरणे आणि कायद्यांमध्ये बदल आवश्यक आहे. तसेच महिलांना गरोदरपणाच्या पगारी रजांबरोबरच काही काळ 'वर्क फ्रॉम होम' सुद्धा द्यायला हवे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणेच महिलांना करिअरमध्ये मल्टीपल एंट्री आणि मल्टीपल एक्झीटचा पर्याच देणे गरजेचे आहे. जेणेकरून मुलांच्या संगोपनाबद्दल भविष्यात मानसिकता बदलेल. असेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु