शरद पवारांनी स्वीकारली मृत संतोष देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
बीड, 21 डिसेंबर (हिं.स.) - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावी भेट देऊन हत्याकांडातील पीडित संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी खासदार बजरंग सोनवणे, खासदार निलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्
शरद पवार संतोष देशमुख कुटुंबीय भेट


बीड, 21 डिसेंबर (हिं.स.) - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावी भेट देऊन हत्याकांडातील पीडित संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी खासदार बजरंग सोनवणे, खासदार निलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक नेते सोबत होते. शरद पवारांसमोर आपली कैफीयत मांडताना मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या लेकीला अश्रू अनावर झाले. एकंदरीत येथील वातावरण अधिकच भावूक झालं होतं. दरम्यान, शरद पवार यांनी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीसह दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे आपल्या भाषणातून जाहीर केले.

पवार म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार, सर्व लोकप्रतिनिधी हे या कुटुंबाच्या मागे आहेत. कृपा करा आणि दहशत कमी करण्यासाठी प्रयत्न करा. बीड जिल्ह्यात ही गोष्ट घडली हे आम्हाला न शोभणारे आहे. संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. आमच्या बारामतीमध्ये 9 हजार मुली शिक्षण घेतात, त्यामध्ये ही एक असेल, असे म्हणत शरद पवारांनी वैभवी देशमुखच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. तसेच, तुम्ही एकटे नाहीत, तुमच्या मागे आम्ही सगळे आहोत. गेलेला माणूस परत आणू शकत नाही, पण आपण धीर देऊ शकतो, असेही पवार म्हणाले.

संतोष देशमुखांची ज्या प्रकारे हत्या केली तशीच शिक्षा आरोपींना झाली पाहिजे. आम्हाला केवळ न्याय हवा, अशी मागणी देशमुख कुटुंबाने पवारांकडे केली. आम्हाला न्याय द्या, अशी मागणी करताना सरपंच संतोष देशमुख यांच्या आईला अश्रू अनावर झाले. आम्हाला न्याय पाहिजे. लवकराच लवकर आरोपींना शिक्षा द्या आमच्या मुलाचं हाल केलं तसंच त्यांचं हाल करा. त्यांना फाशी देऊन मोकळं करू नका. त्यांना झिजवून मारा. तेव्हाच आमच्या आत्म्याला शांती मिळेल. तसेच फक्त आम्हाला नाही तर आमच्या पूर्ण गावाला संरक्षण द्या, अशी मागणी संतोष देशमुखांच्या आईने केली आहे. तसेच देशमुख यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. या दोन्ही मुलांचे पुर्ण शिक्षण करणार असल्याचे शरद पवारांनी आश्वासन दिले.

या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासने दिली आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही रक्कम दिली आहे, ठिक आहे याने कुटुंबियाला मदत होईल, पण गेलेला माणूस येत नाही, त्या कुटुंबाचे दु:ख आहे, ते काय जाऊ शकत नाही. पण जोपर्यंत या घटनेच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत, जो सूत्रधार आहेत. त्यांना तातडीने योग्य प्रकारे धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा शब्द पवारांनी देशमुख कुटुंबियांना दिला आहे. कृपा करा दहशतीतून बाहेर पडा. आपण सर्व मिळून तोंड देऊ. एकदा आपण एकत्र उभं राहिल्यावर कोणी आपल्याला अडवू शकत नाही. बीडमध्ये ही गोष्ट घडतेय. ही गोष्ट बरोबर नाही. न्याय मिळाला पाहिजे. दु:खात आपण सर्व आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी स्थानिक ग्रामस्थांनीही संताप व्यक्त केला. आम्ही सगळे भयभीत आहोत, उद्या कुणाचा नंबर लागेल याचा नेम राहिला नाही, म्हणून मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. तर, सगळ्या आरोपींना अटक करुन आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी संतोष देशमुख यांची कन्या वैभवीने केली.

बजरंग सोनवणे यांनी सरपंच फक्त भांडण सोडायला गेले होते, यात सुरक्षा रक्षकाची साधी फिर्याद सुद्धा घेतली नाही. काल मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार, पण कधी? तसेच, मुख्य सूत्रधाराला कधी अटक करणार, असा सवाल उपस्थित केला. तर, संदीप क्षीरसागर म्हणाले की, आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींना टार्गेट केले जाणार आहे. त्यामुळे, या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात करा. याचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे, आता रडून भागणार नाही. खंडणीमध्ये वाल्मिक कराड यांचे नाव टाकले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande