मुंबई , 24 डिसेंबर (हिं.स.)।आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सालचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही 19 फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून 9 मार्च रोजी त्याचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेतील आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याची तारीखहि आता समोर आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक आयसीसीकडून जाहीर करण्यात आले आहे.या स्पर्धेचं यजमानपद हे पाकिस्ताकडे आहे. पण भारत आणि पाकिस्तानचे सामने हे यूएईमधील दुबई शहरात आयोजित करण्यात येणार आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. हा सामनाही दुबईत होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलसाठी यूएईची निवड केली होती. त्यामुळे भारतीय संघ आपले सर्व सामने यूएईमध्ये खेळणार आहे.चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च रोजी लाहोरमध्ये खेळवला जाणार आहे.पण जर या स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर अंतिम सामना दुबईत खेळला जाणार आहे.
या स्पर्धेतील पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे.टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. यानंतर 23 फेब्रुवारीला दुबईच्या मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यातील महान सामना रंगणार आहे. अफगाणिस्तानचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. हा सामना कराचीत होणार आहे. 22 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे.त्यानंतर टीम इंडिया 2 मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे. जर भारतीय संघ गट टप्प्यात दमदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर रोहितची टीम दुबईत 4 मार्च रोजी या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खेळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash