चेन्नई , 26 डिसेंबर (हिं.स.)।सध्या जगभरात विश्वविजेता ग्रँडमास्टर डी. गुकेश याची प्रचंड चर्चा आहे. गुकेशने नुकताच सिंगापूर येथे झालेल्या रोमहर्षक फायनलमध्ये चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता होण्याचा मान मिळवला आहे.त्यांनतर भारतात परत आलेल्या गुकेश आणि त्याच्या पालकांनी चेन्नईमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतली आहे.
गुकेशने त्याच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तो रजनीकांतसोबत उभा आहे. त्यानं लिहिलं, सुपरस्टार रजनीकांत सर, तुमच्या शुभेच्छा आणि वेळेबद्दल धन्यवाद. तुमच्यासोबत घालवलेला वेळ आणि तुमचा सल्ला आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे.रजनीकांत यांच्याशिवाय, गुकेशनं 'अमरन' स्टार शिवकार्तिकेयनचीही भेट घेतली. अभिनेत्याने त्याला एक आलिशान घड्याळ भेट दिलं आहे. गुकेशने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, शिवकार्तिकेयन सरांसोबत खूप छान वेळ घालवला. इतके व्यस्त असूनही त्यांनी आमच्यासोबत वेळ घालवला.
गुकेशने अवघ्या १८ वर्षी हा किताब जिंकला आहे. १८वा विश्वविजेता म्हणून गुकेशचे नाव बुद्धिबळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेलं आहे.भारताने 11 वर्षांनंतर बुद्धिबळ चॅम्पियनशिप परत मिळवले आले. बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर गुकेशला अमिताभ बच्चन, मोहनलाल, महेश बाबू यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सकडून शुभेच्छा मिळाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याचे अभिनंदन केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash