नवी दिल्ली, 26
डिसेंबर (हिं.स.) : माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 92
वर्षांचे होते. प्रकृती खालावल्याने
गुरुवारी संध्याकाळी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान
त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभर शोककळा पसरली असून
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, गृहमंत्री अमित शाह, रस्ते
वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि काँग्रेस अध्यक्ष
मल्लिकार्जुन खर्गे यांनी श्रद्धांजली अर्पित केलीय.
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत त्यांच्यासोबतचे
जुने फोटो ट्विटरवर (एक्स) शेअर केले आहेत. या फोटोंसह जारी केलेल्या शोक संदेशात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाची आठवणही सांगितली. मुख्यमंत्रिपदाच्या
कार्यकाळात त्यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी अनेक
मुद्द्यांवर सतत चर्चा केली. कारभाराच्या मुद्द्यावर त्यांच्याशी अनेक चर्चा झाल्याचे स्मरण केले. तसेच
मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे मोठी हानी झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तर
गृहमंत्री अमित शाह यांनी देखी डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करता
त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना केली
आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
आपल्या शोक संदेशात म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख
झाले. ते अर्थमंत्री असताना त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचे
काम केले. ते उच्चशिक्षीत, विनम्र, शालिन आणि देशाप्रति समर्पित होते. भाजपाध्यक्ष असताना मला अनेकदा त्यांच्याशी
संवाद करण्याची संधी मिळाली होती. देशाला पुढे नेण्याचा ते सातत्याने विचार
करायचे. भारतीय राजकीय व्यवस्थेतील ते अविस्मरणीय व्यक्तिमत्व होते असे गडकरींनी
आपल्या शोक संदेशात नमूद केले आहे. माजी पंतप्रधान आणि जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा
यांनी ट्वीटवरवर जारी केलेल्या शोक
संदेशात सांगितले की माजी पंतप्रधान
मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. ते चांगले आणि सहनशील व्यक्ती होते. तसेच हुशार अर्थशास्त्रज्ञ आणि आदरणीय सहकारी म्हणून सदैव स्मरणात राहतील असे एचडी
देवेगौडा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटले आहे. तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी
देखी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबतचे जुने फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त
केल्या आहेत. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि इतिहास नक्कीच त्यांचे
मूल्यमापन करेल, असे सांगितले.
निःसंशयपणे, इतिहास तुमचा न्याय
करेल, डॉ. मनमोहन सिंग जी!
माजी पंतप्रधानांच्या निधनाने भारताने एक दूरदर्शी राजकारणी, निष्कलंक सचोटीचा नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थतज्ञ गमावला
आहे नमूद केले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी