इम्फाल, 27 डिसेंबर (हिं.स.) : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. मणिपूरच्या इम्फाल पूर्व जिल्ह्यातील 2 गावांवर डोंगराळ भागातील सशस्त्र लोकांनी आज, शुक्रवारी बंदुका आणि बॉम्बने हल्ला केला. त्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे.
यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे हल्ले सानसाबी आणि थमनापोकपी गावात झाले. मात्र, या हल्ल्यांमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले, परिणामी दोन्ही गावांमध्ये भीषण गोळीबार झाला. पहाडी भागातील सशस्त्र लोकांनी सकाळी 10.45 च्या सुमारास सानसाबी गाव आणि आसपासच्या भागात अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्ब फेकण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांना सुरक्षादलांनी प्रत्युत्तर दिले. सांगितले. जेव्हा सशस्त्र लोक आणि सुरक्षा जवानांमध्ये गोळीबार सुरू झाला तेव्हा स्थानिक लोक इकडे-तिकडे पळत सुटले होते. सशस्त्र हल्लेखोरानी सकाळी 11.30 वाजता जिल्ह्यातील थमनापोकपी गावातही हल्ला केला, त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी सीआरपीएफच्या जवानांसह सुरक्षा दलांनी गोळीबारात अडकलेल्या अनेक महिला, मुले आणि वृद्धांची सुटका केली. मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी-जो गटांमध्ये मे 2023 पासून हिंसाचार सुरू असून आतापर्यंत 250 हून अधिक लोक मारले गेले असून हजारो लोक बेघर झाले आहेत.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी