पक्षाला मजबूत करा, कार्यकर्त्यांचं जाळं तयार करा - राहुल गांधी
बेळगाव, 26 डिसेंबर (हिं.स.) : भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आपण देशाला जागे केले. याचा अर्थ असा नाही की, आपल्याकडे केडर नसले पाहिजे. लोकांचा पाठिंबा असलेला आपला पक्ष आहे. आपल्याला कार्यकर्त्यांचं जाळं तयार करावं लागेल. पक्षाने तुम्हाला उभं केलं, आत
अखिल भारतीय काँग्रेस बेळगाव अधिवेशन


अखिल भारतीय काँग्रेस बेळगाव अधिवेशन


बेळगाव, 26 डिसेंबर (हिं.स.) : भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आपण देशाला जागे केले. याचा अर्थ असा नाही की, आपल्याकडे केडर नसले पाहिजे. लोकांचा पाठिंबा असलेला आपला पक्ष आहे. आपल्याला कार्यकर्त्यांचं जाळं तयार करावं लागेल. पक्षाने तुम्हाला उभं केलं, आता तुम्ही पक्षाला मजबूत करायला पाहिजे. वरिष्ठ नेत्यांनी पक्ष मजबूत करण्याचे काम केले पाहिजे, असे निर्देश काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज,गुरुवारी दिले. अखिल भारतीय काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाचे यंदा शतक महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच काॅंग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या अधिवेशनासाठी काॅंग्रेसचे देशभरातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील चौकाचौकात, तसेच महापुरुष आणि वेगवेगळ्या प्रसिद्ध स्थळांच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या बैठकीत 2025 साठी पक्षाच्या कृती आराखड्याची निर्मितीवर विचारमंथन केले जात आहे. देशातील सुमारे 200 नेत्यांचा सहभाग असणाऱ्या या बैठकीला ‘नवसत्याग्रह’ बैठक असे नाव देण्यात आले आहे. राहुल गांधींनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही जमिनीवर काम करण्याचे स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

दिल्लीत बसता ते ठीक आहे, पण मोठ्या शहरातून बाहेर पडून जिल्ह्यांपर्यंत जावं लागेल. विचारधारेसाठी लढणाऱ्यांना पक्षात जागा द्यावी लागेल. आरएसएसकडे अजिबात वाहून घेतलेले कार्यकर्ते नाहीत. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा १० टक्के जास्त वाहून घेतलेले कार्यकर्ते आहेत. पण, आपण त्यांना स्थान देत नाही. देशात विचारधारेची लढाई सुरू आहे. एकीकडे गांधी, नानक, बसवण्णा तर दुसरीकडे मनु. ही लढाई आपल्याला लढावी लागेल.

भाजप सरकारच्या काळात महात्मा गांधींचा वारसा धोक्यात- सोनिया गांधी

दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या बैठकीसाठी उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीला एक पत्र लिहिले आहे. सोनिया गांधी यांनी पक्षाला लिहिलेल्या पत्रात भाजप सरकारच्या काळात महात्मा गांधींचा वारसा धोक्यात असल्याचा दावा केला आहे. सोनिया गांधी आपल्या पत्रात म्हणतात, 'देशात वेगवेगळ्या ठिकाणी गांधीवादी संस्थांवर हल्ले होत आहेत. या संघटनांनी कधीच स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला नाही, उलट महात्मा गांधींना कडाडून विरोध केला. या संघटनांनी असे विषारी वातावरण निर्माण केले, ज्यामुळे महात्मा गांधींच्या हत्येचा मार्ग मोकळा झाला. हे लोक महात्मा गांधींच्या खुन्यांचा गौरव करतात, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या या बैठकीला नव सत्याग्रह सभा म्हणणे वावगे ठरणार नाही. आता पूर्ण ताकदीने आणि दृढ निश्चयाने या शक्तींचा मुकाबला करावा लागेल. आपली संघटना मजबूत करण्याचा प्रश्नही आज निर्माण झाला आहे. आपल्या संघटनेचा इतिहास इतका गौरवशाली आहे की, पक्षाने वेळोवेळी हे दाखवून दिले आहे. या बैठकीद्वारे आपण वैयक्तिक आणि सामूहिकपणे पुढे जाऊया आणि आपल्या पक्षासमोरील आव्हानांना नव्याने तोंड देऊ. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनो, या ऐतिहासिक सोहळ्याला मी तुम्हा सर्वांसोबत उपस्थित राहू शकत नाही, याचे मला दु:ख आहे. बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 39वे अधिवेशन झाले होते. महात्मा गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनणे, हा आमच्या पक्षासाठी आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. आपल्या देशाच्या इतिहासातील हा एक परिवर्तनाचा टप्पा होता. आज आपण महात्मा गांधींच्या वारशाचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्वतःला समर्पित करतो. ते आपले प्रमुख प्रेरणास्रोत होते आणि राहतील. त्यांचा वारसा भाजप सरकार आणि त्यांचे पालनपोषण करणाऱ्या विचारधारा आणि संस्थांकडून धोक्यात आला आहे.

शाहांसारखे लोक लोकशाहीत नसावेत - खरगे

अधिवेशनात बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले, अमित शाह यांच्यासारखे लोक लोकशाही नसावेत. जसे विधान त्यांनी संसदेत बाबासाहेब आंबेडकरांबद्दल दिले, त्याबद्दल जास्त बोललं जाऊ शकत नाही.

शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते सुवर्णसौध येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. त्यानंतर ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली होणार आहे. शहरातील सीपीएड कॉलेज मैदानावर दुपारी 1 वाजता जाहीर सभा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वतीने मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगावमध्ये काँग्रेसच्या कार्यसमितीचे अधिवेशन का होत आहे?

फेब्रुवारी 1924 मध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर महात्मा गांधी तुरुंगात बाहेर आले होते. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकजूट नसल्याने ते निराश होते. दोन्ही समुदायातील अंतर दूर करण्यासाठी त्यांनी 18 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर असे 21 दिवस उपवास केला होता. काँग्रेसमधील गटबाजीही त्यांना संपवायची होती. त्यासाठी त्यांनी बेळगावमध्ये अधिवेशन घेऊन सभा घेतली होती. 1924 साली याच अधिवेशनाच्या शताब्दी वर्षानिमित्त आता दोन दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande