पुणे, 26 डिसेंबर (हिं.स.)।
पालकमंत्री पदाबाबत राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतात. त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून निर्णय करतील. आमचा पालकमंत्री पदाबाबत कोणताही फॉर्म्युला नसून समन्वय हा आमचा फॉर्म्युला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत सांगितले.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिव्हिल कोर्ट ते मंडई मेट्रो स्टेशन असा मेट्रो प्रवास केला. यावेळी त्यांनी महामेट्रोचे प्रमुख श्रावण हर्डीकर यांचा सन्मान केला. त्यानंतर मंडई येथे मेट्रो स्टेशन गेट दोनची पाहणी केली. यावेळी आमदार हेमंत रासने, भाजपचे सरचिटणीस रवी साळेगावकर, प्रमोद कोंढरे, स्वरदा बापट, डॉ. संदीप बुटाला यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु