मुंबई, 27 डिसेंबर, (हिं.स.)। माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारताचे राजकारण व अर्थकारणावर अमिट छाप सोडणारा एक थोर मुत्सद्दी, एक अर्थशास्त्री काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले की, भारताच्या आर्थिक उदारीकरण प्रकियेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. देशाचे अर्थमंत्री व पंतप्रधान म्हणून त्यांनी अर्थव्यवस्थेतील आमुलाग्र बदलांसह माहितीचा अधिकार कायदा व 'मनरेगा' सारखे महत्वपूर्ण निर्णय घेतले.
दिवंगत माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात डॉ. शंकरराव चव्हाण व डॉ. मनमोहन सिंग दोघेही मंत्री होते. तेव्हापासून त्यांच्याशी माझा परिचय होता. अनेकदा आमचा संवाद होत असे. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रासाठी त्यांनी भरभरून मदत केली. गुरुता गद्दी सोहळ्याचे आयोजन करताना त्यांनी नांदेडमधील पायाभूत सुविधांसाठी दाखवलेली सकारात्मकता व केलेली भरीव मदत मी कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात नेहमीच आदराचे एक वेगळे स्थान होते व ते कायम राहिल.
दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन माझ्यासाठी व्यक्तीगत हानी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर