नवी दिल्ली, 27 डिसेंबर (हिं.स.) : हवामान बदलामुळे 2024 मध्ये जगभरातील उन्हाळ्याच्या दिवसांच्या संख्येत 41 दिवसांची वाढ झाली. यासंदर्भात नवीन संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून 2024 चा उल्लेख करावा लागेल असे वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशनचे प्रमुख डॉ. फ्रेडरिक ओटो यांनी म्हंटले आहे.
डॉ. फ्रेडरिक ओटो यांनी सांगितले की जगभरातील लाखो लोकांना उष्णता आणि संबंधित आजारांमुळे विस्थापित व्हावे लागले. वातावरणातील बदलामुळे पूर, वादळ आणि दुष्काळामुळेही लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले. या काळात 3700 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जोपर्यंत जग जीवाश्म इंधन जाळत राहील, तोपर्यंत हवामान बदलाची समस्या वाढत जाईल. दरवर्षी तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ होत राहिल्यास 2040 पर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते, असेही संशोधनात सांगण्यात आले. काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे दीडशे किंवा त्याहून अधिक दिवस उष्मा राहिला. हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लवकरच पावले उचलण्याची गरज आहे. जगभरात सुमारे 13 महिने उष्णतेची लाट कायम होती.आफ्रिकन देश सुदान, नायजेरिया आणि कॅमेरूनमध्ये तीव्र उष्णतेमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तीव्र उष्णतेने उत्तर कॅलिफोर्निया आणि डेथ व्हॅलीमध्येही कहर केला. दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये तीव्र उष्णतेमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाने असा इशारा दिला आहे की जर कोणतीही कारवाई केली नाही तर हवामान बदलामुळे घटनांमध्ये आणखी वाढ होऊ शकते, कारण या वर्षी जीवाश्म इंधन जाळल्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा जास्त कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात पाठविला गेला आहे, ज्यामुळे मृत्यू होत असून पृथ्वी खूप गरम झाली आहे.
------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी