चंद्रपूर, 27 डिसेंबर (हिं.स.)।चित्रपट सृष्टी म्हणजे मुंबई असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. केवळ मुंबईतील निर्माते चित्रपट तयार करू शकतात असा काहीसा अनुभव आहे. ग्रामीण भागातील युवक चित्रपट निर्माण करू शकत नाही, हा समज चंद्रपूर आणि यवतमाळ येथील तरुणांनी मोडीत काढला आहे. अवघ्या ३०-३५ वयाच्या युवकांनी ग्रामीण भागातच तंत्रज्ञानाचा वापर करून काजू या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. शूटिंग साठी लागणारे तंत्रज्ञानाचा वापर करून मुलगी आणि वडिलांच्या हळव्या नात्याची विण असलेला काजू या मराठी चित्रपटाची निर्मिती करून चित्रपटसृष्टीत येऊ पाहणार्या तरुणांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. काजू हा मराठी चित्रपट येत्या ३ जानेवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. यानिमित्त काजू या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक रोशन दुपारे, मुख्य कलावंत अमित राऊत, अभिनेत्री रेणुका, बालकलावंत शरयू या कलावंतानी शुुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी चंद्रपूरला भेट दिली. यावेळी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ येथे 'काजू' चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी 'मिट द प्रेस' आयोजित केली होती. यावेळी दिग्दर्शक रोशन दुपारे यांनी काजू चित्रपटाची निर्मिती आणि त्याचा प्रवास याविषयी पत्रकाराशी संवाद साधला. तर चित्रपटात बापाची भूमिका साकारणारे अमित राऊत यांनी मुलगी आणि वडिलांच्या भावनिक नात्यावर भाष्य केले. अभिनेत्री रेणुका हिने मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाची होणारे आर्थिक घालमेल आणि संघर्ष याचा उलगडा केला. तर बालकलावांत शरयु हिने शूटिंग दरम्यान झालेले. काही किस्से आणि आठवणी सांगितल्या. पत्रकारांच्या प्रश्नांचे समाधान करून चंद्रपुरात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन काजू चित्रपट बघण्याचे यावेळी आवाहन केले. यावेळी चित्रपटातील डायलॉग सादर करून उपस्थिताची कलाकारांनी मने जिंकली. यावेळी अध्यक्षस्थानी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर, सचिव प्रवीण बतकी, उपाध्यक्ष योगेश चिंधालोरे यांची आवर्जून उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले. संचालन बाळू रामटेके यांनी तर आभार प्रवीण बतकी यांनी मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव