- खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा
बीड, 28 डिसेंबर (हिं.स.) - मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला 19 दिवस पूर्ण झाले आहेत. या घटनेवरून राजकारण देखील तापलं आहे. या घटनेचा मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे विरोधक-सत्ताधारी यांच्यात देखील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची नियुक्ती करावी, अशा मागण्या केल्या जात आहेत. दरम्यान देशमुख यांचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून जोर धरत आहे. देशमुख यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज बीडमध्ये भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात छत्रपती संभाजीराजे, मनोज जरांगे देखील सहभागी झाले होते.
देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, सर्व आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. या प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधी तज्ज्ञ उज्ज्वल निकम व विधी तज्ज्ञ सतीश माणशिंदे यांची नियुक्ती व्हावी, त्याचप्रमाणे राजकीय हस्तक्षेपामुळे देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळू देणार नाही, यासाठीचं हे प्रकरण मुंबईला वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बीडचा मोर्चा आहे तो सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आहे. त्यांच्या मुलीला, त्यांच्या आईला, पत्नीला, त्यांच्या भावाला, न्याय देण्यासाठी या मोर्चाचा आयोजन केलं आहे. या मोर्चाला बीडसह राज्यभरातून जनतेचा प्रतिसाद आहे. त्याचबरोबर सर्व संघटना आलेल्या आहेत. आम्ही दोन दिवसाचा अल्टीमेटम सरकारला दिला होता. त्यांनी दोन दिवसामध्ये मोर्चापूर्वी वाल्मिक कराडला आणि त्याच्या गुंडांना ताब्यात घ्यायला सुरुवात करायला पाहिजे होती. सरकार कारवाई केल्यासारखं दाखवते, पण अद्याप आरोपी मोकाट फिरत आहेत. आज 19 दिवस झाले आहे तरी या प्रकरणातील सूत्रधार मोकाट फिरतो आहे. आमच्या सर्वांचा एकच म्हणणं आहे. या मोर्चातून सरकारने धडा घ्यावा, बोध घ्यावा आणि तात्काळ या प्रकरणातील आरोपींना अटक करावी. त्याचबरोबर ही टोळी चालवणारा आणि टोळीतला एका-एका लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, तसे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, ते कधी लावणार असा प्रश्न आहे. तो जो वाल्मिक कराड आहे, त्याला प्रमुख आरोपी करा आणि जितके आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या. फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून हे प्रकरण चालवा, अशी आमची मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे. यामध्ये वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी उज्वल निकम आणि सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करावी. हे प्रकरण बीडमध्ये न ठेवता हे प्रकरण मुंबईमध्ये वर्ग करण्यात यावं, कारण बीडमध्ये जर हा खटला चालवला तर राजकीय हस्तक्षेप होईल आणि या कुटुंबाला न्याय मिळणार नाही आणि यासाठी सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे, सरकारने तात्काळ याबाबतचा निर्णय घ्यावा, अन्यथा याच्या परिणाम सरकारला भोगावे लागतील, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी