अमरावती, 28 डिसेंबर (हिं.स.)
जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांत राबवलेल्या आरोग्य तपासणीत ६९ बालकांना हृदयविकार आढळून आला आहे. त्यांची तपासणी केली असता, त्यांच्या हृदयाला छिद्र असल्याने वेळीच शस्त्रक्रिया करून या मुलांना जीवनदान दिले आहे. तसेच ज्या मुलांमध्ये जन्मजात विकृती तसेच इतर आजार आढळले, अशा ४०२ बालकांवरही विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय विभागाने दिली आहे.
१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत शाळेत राबवण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत ६९ बालकांना हृदयविकार असल्याचे आढळून आल्याने वेळीच त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर, ४०२ बालकांवर इतर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी, शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर बालकांच्या विविध तपासण्या केल्या जातात. यासाठी तपासणी कॅम्पही शाळा, महाविद्यालय स्तरावर राबवले जातात. यामध्ये काही बालकांमध्ये जन्मानंतर एएसडी, व्हीएसडी आणि पीडीए हे हृदयाशी संबंधित आजार आढळून येतात. या आजारात फुप्फुसांकडे होणाऱ्या अतिरिक्त रक्त प्रवाहामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, धाप लागणे, थकवा वाटणे, वजन न वाढणे यासारख्या समस्या दिसून येतात. दरम्यान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत १ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या विविध गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. आठ महिन्यांत ६९ बालकांवर हृदयविकार, तर ४०२ बालकांवर इतर शस्त्रक्रिया झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी