मुंबई, 27 डिसेंबर (हिं.स.) - आयआयटी बॉम्बेच्या (मुंबई) एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाच्या संशोधकांनी शॉकवेव्हजवर आधारित एक नवी सिरिंज तयार केली आहे. आतापर्यंत जी इंजेक्शन सिरिंज वापरतो त्यापेक्षा ही खूप वेगळी असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी जर्नल ऑफ बायोमेडिकल मटेरियल्स अँड डिव्हाईसेसमध्ये या तंत्रज्ञानाविषयीचा अहवाल प्रकाशित केला आहे. ज्यात या सिरिंजच्या मदतीने वेदना न होता इंजेक्शनमधील औषध अगदी काही क्षणात शरीरात पोहोचेल आणि त्वचेला इजा होणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. फक्त इंजेक्शनच्या सुईची भीती किंवा टोचण्याचा त्रास दूर करण्यासाठी ही सुई तयार करण्यात आली नसून अचूक आणि वेगाने शरीरात औषध पोहोचवण्यासाठी या नव्या शॉकव्हेज सिरिंजची रचना केल्याचे संशोधकांच्या टीमने म्हटले आहे.
ही सिरिंज उच्च-ऊर्जा दाब लहरी (शॉक वेव्ह) वर काम करते. यातील शॉकव्हेज् या ध्वनीच्या वेगापेक्षा वेगाने त्वचेच्या थरांमध्ये प्रवेश करतात. यामुळे इंजेक्शन सिरिंजमधील औषध सुई नसतानाही शरीरात पोहोचतं. संशोधकांनी या सिरिंजच्या नोझलची रचना केवळ 125 मायक्रॉन म्हणजे मानवी केसांच्या रुंदी इतकीच ठेवली आहे. त्यामुळे डास चावल्यावर जितका त्रास होतो त्यापेक्षा कितीतरी कमी त्रास या ‘शॉकव्हेव बेस्ड नीडल फ्री सिरिंज (Shockwave Based Needle-Free Syringe) मुळे होणार आहे. या नव्या सिरिंजच्या मदतीने अवघ्या काही सेकंदात हे औषध शरीरात पोहोचतं आणि त्याचा प्रभावही दिसून येतो. याशिवाय ही सिरिंज बनवणाऱ्या टीमचा दावा आहे की, या सिरिंजमुळे संसर्गाचा धोकाही कमी होईल. हाय डायबिटीस असलेल्यांना दिवसातून किमान 2 किंवा 3 वेळा इंजेक्शनद्वारे इन्सुलिन घ्यावं लागतं. अशा रूग्णांसाठी ही नवी नीडल फ्री इंजेक्शन सिरिंज फायद्याची ठरू शकेल.
नव्या सिरिंजमुळे त्वचेला कोणताही धोका निर्माण होणार नाही - प्रियांका हंकारे
या संशोधनाच्या प्रमुख प्रियांका हंकारे यांनी म्हटलं आहे की, वारंवार सामान्य सिरिंजचा वापर केल्याने त्वचेच्या ऊतींचं नुकसान होऊ शकतं, मात्र या नव्या सिरिंजमुळे त्वचेला कोणताही धोका निर्माण होणार नाही. याशिवाय योग्य ठिकाणी आणि वेगाने औषध शरीरात पोहोचवलं जाऊ शकतं. यासाठी सिरिंजच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सिरिंजमधील औषध योग्यरित्या, त्वचेला आणि शरीराला कोणतीही हानी न होता पोहोचेल यासाठी सिंथेटिक त्वचेसारख्या टिश्यू सिम्युलेंटवरही सिरिंजची चाचणी केली आहे. फक्त इंजेक्शनच नाहीत ऑपरेशनपूर्वी आणि दरम्यान वापरली जाणारी भूल देणारी इंजेक्शन आणि अँटीफंगल औषधांसह विविध औषधांची चाचणी या सिरिंजच्या माध्यमातून उंदरांवर केली गेली. नीडल फ्री सिरिंजची परिणामत्मकता चांगली दिसून आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, डायबिटीस असलेल्या उंदरांना जेव्हा या नीडल फ्री सिरिंजमधून इन्सुलिन दिलं गेलं, तेव्हा शॉक व्हेव सिरिंजने रक्तातील साखरेचं प्रमाण अधिक चांगलं आणि दीर्घ काळासाठी नियंत्रणात ठेवलं. या संशोधनाचा परिणाम असं दर्शवितो की, शॉक सिरिंज केवळ औषधं शरीरात अधिक प्रभावीपणे पोहोचवत नाहीत तर त्यांच्या परिणात्मकतेमध्ये वाढ होते. शिवाय यामुळे त्वचेची जळजळ आणि नुकसानसुद्धा कमी होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नवीन तंत्रज्ञानावर आधारित या सुया स्वस्त असून त्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या आहेत आणि एका सिरिंजचा वापर दीर्घकाळ करता येतो.
हे नवीन सिरिंज जे लोक सुईला घाबरतात, ज्यांना लस किंवा इंजेक्शन मिळण्याची भीती वाटते, मधुमेहाचे रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल. संसर्ग प्रतिबंध असून सिरिंज संसर्गाचा धोका कमी करते कारण सुईचा वापर होत नाही.
वैशिष्ट्य पाहिल्यास सिरिंजचे नोझल अत्यंत पातळ आहे, कोणत्याही वेदना किंवा दुखापतीशिवाय औषध शरीरात पोहोचते, औषधाची अचूक मात्रा योग्य ठिकाणी पोहोचेल असं डिझाइन करण्यात आलं आहे, त्वचा आणि ऊतींना कोणतंही नुकसान होत नाही, खर्च पारंपारिक इंजेक्शनपेक्षा कमी आहे.
संशोधकांच्या मते हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरण्यास तयार आहे. शॉक सिरिंजमुळे औषधं लवकर आणि सुरक्षितपणे दिली जाऊ शकतात. या तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा क्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी