कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
बांदा, 28 मार्च (हिं.स.) : उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या धक्क्याने म
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू


बांदा, 28 मार्च (हिं.स.) : उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालाय. मुख्तारला छातीत वेदना होत असल्यामुळे त्याला बांदा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा आज, गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुख्तार हा माजी उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांचा पुतण्या होता.

मुख्तार अन्सारी हा समाजवादी पार्टीकडून 5 वेळा आमदार राहिला होता. त्याच्यावर हत्या, खंडणी आणि जमीन बळकावण्याचे 61 गुन्हे दाखल होते. तसेच कॉन्ट्रॅक्टर सच्चिदानंद राय यांच्या हत्येचा गुन्हा अन्सारीवर होता. त्याचबरोबर काँग्रेस नेते अवधेश राय यांची त्यानं काशी इथं हत्या केली होती. त्याशिवाय भाजपचे आमदार कृष्णानंद राय यांची मुख्तारने 21 गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणी मुख्तारला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून मुख्तारची प्रकृती बिघडल्यामुळे मंगळवारी 26 मार्च रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच त्याच्या गाझीपूर इथल्या निवासस्थानाबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. या बातमीमुळं कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून ज्या रुग्णालयात सध्या त्याचे पार्थीव ठेवण्यात आले आहे, त्या बांदा मेडिकल कॉलेजबाहेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.मुख्तार अन्सारीने न्यायालयात सुनावणी दरम्यान, गंभीर आरोप केले होते. तुरुंगात माझा खून करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जेवणातून सौम्य स्वरुपात विष देण्यात येत आहे. त्यामुळेच माझी प्रकृती बिघडत आहे. या प्रकरणी न्यायालयाने जेल प्रशासनाकडून या मुख्तार अन्सारीचा संपूर्ण अहवाल देखील मागवला होता. मुख्तारच्या मृत्यूनंतर गाझीपूर, मऊ आणि इतर संवेदनशील जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आलाय. शिवाय पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय. गाझीपूर आणि मऊमधील काही भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande