'लूट ईस्ट पॉलिसी' थांबून आता देश ऍक्ट ईस्ट पॉलिसीवर पुढे जातोय - पंतप्रधान
आगरतळा, 17 एप्रिल (हिं.स.) - पूर्वी राजकीय पक्ष आणि सरकारांना मतं हवी तेव्हाच ईशान्येची आठवण यायची.
PM Modi 


आगरतळा, 17 एप्रिल (हिं.स.) - पूर्वी राजकीय पक्ष आणि सरकारांना मतं हवी तेव्हाच ईशान्येची आठवण यायची. काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या सरकारमध्ये ईशान्येसाठी एकच धोरण अवलंबले गेले - 'लूट इस्ट पॉलिसी'. 10 वर्षांपूर्वी मोदींनी काँग्रेस-कम्युनिस्टांच्या इंडी आघाडीची 'लूट ईस्ट पॉलिसी' थांबवली होती. आता देश आपल्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीवर पुढे जात आहे. काँग्रेस सरकारमधील अनेक मंत्री आणि नेत्यांना त्रिपुरा भारताच्या नकाशावर कुठे आहे हे देखील माहित नव्हते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

आगरतळा, त्रिपुरा येथे आज, बुधवारी आयोजित एका विशाल जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक शाह, भाजप प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्यजी, त्रिपुरा पूर्व लोकसभा उमेदवार महाराणी कृती सिंह देबबर्मा आणि पश्चिम त्रिपुरा लोकसभा उमेदवार बिप्लब कुमार देब यांच्यासह पक्षाचे इतर नेते मंचावर उपस्थित होते.

मोदी पुढे म्हणाले की, त्रिपुराच्या विकासासाठी आमच्या सरकारने ज्या हिरा मॉडेलवर काम केले आहे, त्याचीच आज देशभर चर्चा होत आहे. हिरा म्हणजे महामार्ग, इंटरनेट मार्ग, रेल्वे आणि हवाई मार्ग! मी तुम्हाला हे वचन दिले होते आणि मी ते पूर्ण करून दाखवले आहे. ईशान्येच्या विकासासाठी आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत. मी असा पहिला पंतप्रधान आहे, ज्याने गेल्या 10 वर्षांत 50 पेक्षा जास्त वेळा ईशान्येला भेट दिली आहे. पुढील 5 वर्षांसाठी भाजपने सादर केलेले संकल्प पत्र त्रिपुरातील जनतेसाठी विकासाची नवी दारे उघडणार आहे.

भ्रष्टाचाराचे दुकान वाचवण्यासाठी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्र आले आहेत. ते इतके संधीसाधू आहेत की, त्रिपुरामध्ये ते एकत्र लढत आहेत, पण केरळमध्ये ते एकमेकांविरोधात लढत आहेत. केरळमध्ये काँग्रेस कम्युनिस्टांना दहशतवादी म्हणते आणि कम्युनिस्ट काँग्रेसला भ्रष्ट म्हणतात. त्रिपुरामध्ये जोपर्यंत सीपीएम आणि काँग्रेस सत्ताधारी-विरोधी पक्षात राहिले, तोपर्यंत येथे भ्रष्टाचार फोफावत राहिला. कम्युनिस्टांनी त्रिपुराला हिंसाचार आणि भ्रष्टाचाराचे अड्डे बनवले होते. समोरासमोर आणि सत्ताधारी-विरोधात असलेले हे दोन्ही पक्ष आपले भ्रष्टाचाराचे दुकान वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande