पहिल्या टप्प्यात राज्यातील ५ सह एकूण १०२ मतदारसंघातील दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद
- गडकरी, मुनगंटीवार यांच्यासह दिग्गजांच्या जागांकडे विशेष लक्ष नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) - लोक
गडकरी मुनगंटीवार


voting


- गडकरी, मुनगंटीवार यांच्यासह दिग्गजांच्या जागांकडे विशेष लक्ष

नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) - लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी देशभरात उद्या (शुक्रवार) एकूण २१ राज्यांमध्ये १०२ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघांतही दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. देशभरात एकूण सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यातील हा पहिला टप्पा आहे. जाहीर प्रचार बुधवारी सायंकाळी थांबला. त्यानंतर वैयक्तिक भेटीगाठींवर जोर देण्यात आला आहे. आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर येथे मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नागपूर आणि रामटेक मतदारसंघात सुमारे दहा हजारांच्या वर पोलिस अधिकारी, कर्मचारी, निमलष्करी दल, केंद्रीय सशस्त्र दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांसह उत्तर प्रदेश ८, राजस्थान १३, मध्य प्रदेश ६, आसाम ५, बिहार ४, मेघालय २, अरुणाचल प्रदेश २, उत्तराखंड ५, तामिळनाडू ३९, पश्चिम बंगाल ३, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, त्रिपुरा, सिक्कीम, नागालॅंड, अंदमान-निकोबार, मिझोराम, पुदुच्चेरी, मणिपूर आणि लक्षद्वीरमध्ये प्रत्येकी एका जागेवर मतदान होणार आहे.

अशा असतील विदर्भातील प्रमुख लढती

नागपूर - नितीन गडकरी (भाजप) विरुद्ध विकास ठाकरे (काँग्रेस), चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप) विरुद्ध प्रतिभा धानोरकर (काँग्रेस), रामटेक - राजू पारवे (शिंदे गट) विरुद्ध श्यामकुमार बर्वे (काँग्रेस), भंडारा गोंदिया - सुनील मेंढे (भाजप) विरुद्ध प्रशांत पडोळे (काँग्रेस), गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप) विरुद्ध नामदेव किरसान (काँग्रेस)

देशातील अन्य प्रमुख लढती

यासोबतच पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये तेलंगणाचे माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन (चेन्नई दक्षिण, तामिळनाडू), डीएमके नेते दयानिधी मारन (चेन्नई मध्य, तामिळनाडू), माजी केंद्रीय मंत्री ए. राजा (निलगिरी, तामिळनाडू) आणि तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई (कोयंबतूर), जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात उधमपूरमधून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह निवडणूक रिंगणात आहेत. अरुणाचल पश्चिम मतदारसंघातून केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आसामच्या दिब्रुगड, तर काँग्रेस नेते गौरव गोगोई जोरहाटमधून आपले नशीब आजमावणार आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजस्थानच्या बिकानेर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे गोविंद राम मेघवाल मैदानात उतरले आहेत. गोविंद मेघवाल हे राज्यातील अशोक गेहलोत सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande