पुन्हा निवडून आलो तर पुन्हा कॅबिनेट मंत्री होईन : नारायण राणे
रत्नागिरी, 24 एप्रिल, (हिं. स.) : पुन्हा निवडून आलो तर मी पुन्हा कॅबिनेट मंत्री होईन, असा विश्वास रत
पुन्हा निवडून आलो तर पुन्हा कॅबिनेट मंत्री होईन : नारायण राणे


रत्नागिरी, 24 एप्रिल, (हिं. स.) : पुन्हा निवडून आलो तर मी पुन्हा कॅबिनेट मंत्री होईन, असा विश्वास रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी दावा केला होता. अखेर अनेक चर्चांनंतर या जागेवर भाजपाकडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर श्री. राणे यांनी प्रचाराचा धडका लावला आहे. राजापूरमधील प्रचारसभेत बोलताना श्री. राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा एकही खासदार येणार नाही. लोकसभा निवडणूक झाली की १६ पैकी दहा आमदार शिंदे गटात जातील. मग सहा राहतील. त्यापैकी किती येतील हे माहिती नाही. पुढच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल. कारण निवडणुकीनंतर आमदार-खासदार कोणहीही राहणार नाही.

आम्ही भारतीय संविधान बदलणार नाही. यातून आमच्याविरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच बाबासाहेबांच्या अनुयायांना भडकविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी टीका श्री. राणे यांनी केली. या निवडणुकीत आमचे खासदार ४०० पर्यंत जाणार आणि पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार, मग दिल्लीत महाराष्ट्रात विकास कोण करू शकणार? कोकणात पूर येतो, दहा वर्षांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, असा कोणता प्रश्न विनायक राऊत यांनी सोडवला नाही, या शब्दांत श्री. राणे यांनी टीका केली.

माझ्याएवढा राजकारणात नशीबवान कोणी नाही. अनेक लोकांना मी भेटत आहे. लोक मला एकच सांगत आहेत की, यावेळी तुम्हाला मतदान करायला मिळणार, हे आमचे नशीब आहे. असे उद्गार लोकांचे मला ऐकायला मिळत आहेत. आमच्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप कोणी करू शकले नाही. कोणत्याही विषयात आमचे पंतप्रधान कमी पडत नाहीत. प्रत्येक विषयावर त्यांची कमांड आहे. गरिबांविषयी आस्था आहे, असेही नारायण राणे म्हणाले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande