नवी मुंबईत आठही विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहीम
मुंबई, 24 एप्रिल, (हिं.स.) ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत ‘थ्री आर’ संकल्पनेवर विविध उपक्रम राबविण्
नवी मुंबईत आठही विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहीम


मुंबई, 24 एप्रिल, (हिं.स.) ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत ‘थ्री आर’ संकल्पनेवर विविध उपक्रम राबविण्यात येत असून या अनुषंगाने एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून प्लास्टिक पिशव्या व एकल प्लास्टिकचा वापर थांबविण्याबाबत जनजागृती करण्याप्रमाणेच ठिकठिकाणी तपासणी करुन प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

या अंतर्गत महापलिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग कार्यालयांच्या हद्दीत 22 व 23 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात मार्केट्स, रेल्वे स्टेशन्स, बस स्थानके, वाणिज्य संकुले, मार्ट, पथविक्रेते, बाजारपेठा अशा विविध ठिकाणी प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा राबविण्यात आल्या. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व श्री. शिरीष आरदवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे तसेच परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. चंद्रकांत तायडे यांच्या नियंत्रणाखाली, सर्व विभागांचे सहा. आयुक्त यांनी आपापल्या विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यासह या मोहीमा यशस्वीपणे राबविल्या.

यामध्ये 22 एप्रिल रोजी बेलापूर विभागात 2 दुकाने / आस्थापना यांची तपासणी केली असता 12 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक आढळल्याने ते जप्त करण्यात आले व प्रत्येकी रु. 5 हजार याप्रमाणे रु.10 हजार दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे नेरुळ विभागामध्ये एका व्यावसायिकाकडून 2.5 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्ती व रू.5 हजार दंडात्मक वसूली तसेच वाशी विभागात दोन दुकांनामधून 2 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक व एकूण रु.10 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. कोपरखैरणे विभागात एका दुकानदाराकडून 2 किलो प्लास्टिक जप्ती व रु.5 हजार दंड रक्कम, घणसोली विभागात 2 व्यावसायिकांकडून 2.5 किलो प्लास्टिक जप्ती व एकूण रु.10 हजार दंड, ऐरोली विभागात 2 व्यावसायिकांकडून 6.5 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती व रु.10 हजार दंड तसेच दिघा विभागात 2 व्यावसयिकांकडून रु.10 हजार दंड व 1.5 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले. परिमंडळ 2 विभागाच्या भरारी पथकानेही एका व्यावसायिकाकडून अर्धा किलो प्लास्टिक जप्ती व रु.5 हजार दंड वसूल केला. अशाप्रकारे 22 एप्रिल रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधात्मक प्लास्टिक तपासणी धडक मोहिमेत एकूण 13 दुकाने / आस्थापना या ठिकाणांहून एकूण 29.5 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला तसेच एकूण रु. 65 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

अशाच प्रकारे 23 एप्रिल रोजी बेलापूर विभागात 2 व्यावसायिकांकडून 3 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करून प्रत्येकी रु.5 हजार प्रमाणे रु.10 हजार दंड वसूली, वाशी विभागामध्ये 2 दुकानांमधून 2 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती व रू.10 हजार दंडात्मक वसूली आणि तुर्भे विभागात दोन दुकानांमधून 2 किलो 750 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती व रु.10 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. ऐरोली विभागात 2 व्यावसायिकांकडून 7 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती व रु.10 हजार दंड वसूल करण्यात आला. परिमंडळ-2 विभागाच्या भरारी पथकानेही एका व्यावसायिकाकडून 300 ग्रॅम प्लास्टिक जप्ती व रु.5 हजार दंड वसूल केला. अशाप्रकारे 23 एप्रिल रोजी एकूण 9 दुकाने / आस्थापना याठिकाणी सापडलेला एकूण 15 किलो 50 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला तसेच एकूण रु.45 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

अशाप्रकारे 22 व 23 एप्रिल या दोन दिवसात आठही विभाग कार्यालय क्षेत्रात प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधी धडक तपासणी मोहिम राबविण्यात आले. यावेळी अनेक व्यावसायिक व आस्थापना प्लास्टिक पिशव्याऐवजी कागदी व कापडी पिशव्या वापरत असल्याचे निदर्शनास आले. मात्र या मोहीमेच्या तपासणीत एकल वापर प्लास्टिक आढळलेल्या 22 व्यावसायिक / आस्थापना यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत रू. 1 लक्ष 10 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तसेच एकूण 44 किलो 550 ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले.

नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त असावे यादृष्टीने विभाग कार्यालयांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम पटवून देत कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे तसेच एकल वापर प्लास्टिक वापरातून हद्दपार करण्याचे आवाहन केले जात आहे. याशिवाय तपासणी मोहिमांव्दारे प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर आढळल्यास दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande